Oplus_16908288
मुंबई, दि. ५ जुन २०२६ : टी-२० विश्वचषक २०२६ चे विजेतेपद मिळवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवण्याच्या वृत्तानंतर आता भारताच्या नव्या टी-२० कर्णधाराचे नाव अखेर निश्चित झाले आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ चे विजेतेपद मिळवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवण्याच्या वृत्तानंतर आता भारताच्या नव्या टी-२० कर्णधाराचे नाव अखेर निश्चित झाले आहे. बीसीसीआय आणि निवड समितीने भविष्यातील मोठे उद्दिष्ट, म्हणजेच २०२८ मध्ये होणारे लॉस एंजेलिस ऑलिम्पिक गेम्स आणि आगामी टी-२० वर्ल्ड कप डोळ्यांसमोर ठेवून मोठा निर्णय घेतला आहे. सूर्याच्या जागी आता फलंदाज श्रेयस अय्यरकडे भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवले जाणार आहे. त्याचबरोबर वैभव सूर्यवंशीला प्रथमच टीम इंडियात संधी मिळणार आहे.
६ जूनला होणार घोषणा; सूर्याचा पत्ता का कट झाला ?
‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या रिपोर्टनुसार, आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा ६ जून रोजी केली जाईल. याच दिवशी श्रेयस अय्यरच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने याच वर्षी मार्चमध्ये टी-२० विश्वचषक जिंकला असला, तरी त्याचा स्वतःचा फॉर्म अत्यंत खराब होता. त्याची प्लेइंग इलेव्हन मधील जागाही धोक्यात आल्यामुळे निवडकर्त्यांनी हा कडक निर्णय घेतला. श्रेयस अय्यरने आपला शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर २०२३ मध्ये खेळला होता. २०२६ च्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत राखीव खेळाडू म्हणून त्याचा संघात समावेश होता, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आता थेट कर्णधार म्हणून त्याचे पुनरागमन होत आहे.
१५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी रचणार इतिहास; सचिननंतरचा दुसरा खेळाडू !
आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ‘ऑरेंज कॅप’ जिंकणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियातील निवड आता पक्की झाली आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरनंतर भारतीय मुख्य संघात स्थान मिळवणारा वैभव हा भारताचा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरणार आहे. भारतीय संघाला जून महिन्याच्या शेवटी आयर्लंडमध्ये २ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. त्यानंतर जुलैच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका रंगणार आहे. या दोन्ही मोठ्या दौऱ्यांवर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आणि वैभव सूर्यवंशीच्या साथीने टीम इंडिया नव्या मोहिमेची सुरुवात करेल.
