राजे संस्कार प्रतिष्ठानमार्फत सत्कार नवदुर्गांचा
-महेंद्र माने-
ठाणे : जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं… माते तुझ्या नामाच याड लागलं! महाकालीच्या रूपाची गेले काही वर्ष नवरात्रौ उत्सवात भक्तीभावात रंग छटा वेगळीच दिसून येत आहे. नऊ दिवस वेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करून नवरात्र साजरा होत आहे. गत सालपासून कोरोनामुळे महिला वर्गाचा थोडा हिरमोड झाला पण उत्साह तरीही कायम ठेवत सनही साजरा केलाच.
नवरात्र उत्सव म्हणजे एक आनंदाचा समृद्धीचा ऐश्वर्याचा व व पराक्रमाची ओळख करून देणारा उत्सव.खरंतर हा सण स्त्रियांचा नऊ दिवस देवीची पूजा, उपवास यामध्ये त्या नऊ दिवस दंग.एवढेच नव्हे तर दररोज एका नव्या रंगाची साडी नेसण्यास वेगळाच आनंद .वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसायच्या आणि छान छान दिसायचं यासाठी जणू स्पर्धाच लागलेली.
महिलांच्या या उत्साहात राजे संस्कार प्रतिष्ठानने भर टाकली. प्राध्यापक संभाजी शेळके यांच्या “राजे संस्कार प्रतिष्ठान” या संस्थेने यावर्षी समाजाला एक नवीन प्रेरणा देणारा उपक्रम राबवला आहे.सौ.वंदना शेळके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घडून आला.
जवळजवळ गेल्या दीड वर्षापासून अख्ख्या जगावर कोरोनाचं संकट ठाण मांडून बसलंय.या संकटाविरुद्ध समाजातील अनेक योद्धे संघर्ष करत आहेत.यामध्ये केवळ पुरुष मंडळीच नाही तर स्त्रियादेखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्याचबरोबर आपले कुटुंब सांभाळून या संकटाचा सामना करत आहेत.त्यांचे हे योगदान कौतुकास्पद आहे .म्हणून संस्थेने यावर्षी या अशा विविध क्षेत्रात कार्य करत असणा-या महिलांचा विविध रंगाच्या साड्या देऊन कौतुक करण्याचा उपक्रम या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये नऊ दिवस राबवला जातो. त्यामध्ये पल्लवी ताई (रिक्षा चालक), मनालीताई (रुग्णसेविका), अलकाताई (आशावर्कर),रेखाताई (होमगार्ड), सुरेखाताई (सफाई कर्मचारी), भारतीताई (सुरक्षारक्षक), सुनीताताई (पाेलिस कर्मचारी) अनुपमा ताई (पत्रकार), सुजाताताई (घरकाम करणारी सेविका) या सर्व रणरागिणी आपल्या जिवाची पर्वा न करता आपापल्या परीने या कोरोना विरुध्दच्या लढ्यात आपापली जबाबदारी पार पाडत आहेत आणि समाजाला या भयानक आजारापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा या खऱ्या आणि प्रामाणिक योध्यांचा सन्मान होणे गरजेचे होते.
उपक्रमात सहभागी झालेल्या व केवळ स्वत साड्या नेसून उत्सव साजरा करण्यापेक्षा कोरोना काळात विविध जबाबदाऱ्या पार पाडत असणा-या कोरोना योध्ये असणाऱ्या महिलांना साड्या देऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सौ. भारती संजय पाटील, सौ. मधुरा मिलिंद कदम,सौ. सविता राजेंद्र काकडे, सौ ज्योती उमेश जाधव, सौ माधवी प्रसाद चिटणीस, सौ जस्मिन दीपेश गोसर, सौ नूतन दत्तात्रय मोरे, कुमारी राजश्री केरबा सूर्यवंशी व कविता प्रवीणचंद्र रघुवंशी या नवदुर्गांचा सत्कार संस्थेतर्फे विजयादशमी दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्हा महिला व बालविकास कार्यालय ठाणे या कार्यालयाच्या संरक्षण अधिकारी सौ. रेखा राजेंद्र हिरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी सौ. रेखा हिरे मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात महिलांमध्ये स्वसंरक्षणाबाबत जागृती, स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध जागृती, तसेच महिलांसाठी शासनाच्या असलेल्या विविध योजनांची माहिती अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
या उपक्रमात त्यांचे सहकारी स्वप्नील मोरे, त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष गावडे सर ,अॕड. मनोज बडगुजर ,राजेंद्र काकडे, संजय पाटील, दिपेश गोसर, प्रवीणचंद्र रघुवंशी इ.मान्यवर या उपक्रमाला उपस्थित होते.
या उपक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक संभाजी शेळके यांनी केले तर सुत्रसंचलन नेत्रा पांचाळ हिने केले.

