———————
ठाणे दि. १५ डिसेंबर: शासनाने निर्गमित केलेल्या कोविड१९च्या नियंत्रण नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून ठाणे जिल्हा परिषदेचे पहिले ते चौथीचे वर्ग बुधवारपासून सुरु झाले. करोनामुळे मागील दोन वर्षापासून ऑनलाईन धडे गिरवणाऱ्या विद्यार्थांचा अखेर ऑफलाईन किलबिलाट सुरु झाल्याने ग्रामीण भागात विद्यार्थी-शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदी वातावरण पाहायला मिळाले. तसेच सर्वच शाळांमध्ये विविध पद्धतीने मुलांचे स्वागत करण्यात आले.
ठाणे परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेची खबरदारी घेऊनच शाळा सुरू करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी दिल्या होत्या. त्यानुसारच वर्ग सुरु करताना शाळेची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, शिक्षकांची कोविड चाचणी आणि लसीकरण करणे, विद्यार्थी बैठक व्यवस्था करताना दोन विद्यार्थांमध्ये किमान 6 फुट अंतर ठेवूनच मुलांना वर्गात प्रवेश देण्यात आला. त्याचबरोबर मुलांचे तापमान , ऑक्सिजन लेव्हल तपासण्यात आली.


