ठाणे, दि. 22 – मार्च-एप्रिल 2022 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणान्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी.) लेखी परीक्षाचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाची शुक्रवार दि. 04 मार्च 2022 ते बुधवार दि. 30 मार्च 2022 या कालावधीत लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मंगळवार दि. 15 मार्च 2022 ते सोमवार दि. 04 एप्रिल 2022 या कालावधीत लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. याबाबत दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. 21 डिसेंबर 2021 पासून उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/ उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांचकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून प्रसारित झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये.
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे विभागीय सचिव, मुंबई विभागीय मंडळ, वाशी, नवी मुंबई यांनी कळविले आहे.
.

