स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त; जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गणितोत्सवाचे” आयोजन.
ठाणे दि.२२ जि.प: भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा 22 डिसेंबर जन्मदिन प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. शालेय स्तरापासून विध्यार्थ्याना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी गणित दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध गणितीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
अंबरनाथ तालुक्यातील शिळ शाळेत विद्यार्थांनी गणितीय रांगोळी, चित्रकला स्पर्धा,गणितीय खेळ,गणित शब्दकोडी इत्यादी खेळरूपी उपक्रमात भाग घेऊन हा दिवस साजरा केला. तर मुरबाड तालुक्यातील जि प शाळा खरशेत शाळेत गणितीय प्रश्नमंजुषा घेण्यात आली. 63 विद्यार्थी असलेल्या आदिवासीबहुल खरशेत शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध भौमितिक आकार, अंक, गणिती चिन्हे यांची रचना केली. विविध गणिती खेळात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व खेळता खेळता सम संख्या, विषम संख्या, अपूर्णांक इत्यादी समजून घेतले. ह्या खेळांचे व स्पर्धांचे नियोजन व संचालन श्री. अलंकार वारघडे सर यांनी केले.
पायाभूत संख्याज्ञान आणि गणितीय क्षमता विषयी बोलतांना संजय मराठे सर यांनी विद्यार्थांना संख्यात्मक संकल्पना आणि त्यांच्यातील कार्यकारणभाव, गणनपूर्व संकल्पना, संख्याची तुलना,क्रमवार संख्या,वर्गीकरण,आकृतिबंध इत्यादी गोष्टींची प्रात्याक्षिके करून विध्यार्थ्याना समजाऊन सांगितले. परिसरातील गणित, गणित शब्दकोडी,गणित पेटीतील साहित्य,व्यवहारातील गणित इत्यादी बाबींचे कल्पक आणि रंजक खेळ खेळून श्री.तांबे सरांनी विद्यार्थांमधील गणित विषयाची भीती घालवली आणि विद्यार्थांना बोलते केले.
स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थांना प्रोत्साहन म्हणून शाळा व्यवस्थापन समिती,पालक आणि शिक्षकवर्गाकडून शैक्षणिक वस्तूंचे बक्षीस रूपाने वाटप करण्यात आले.
