ठाणे, दि. 30 : दिशा समितीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या विकासाला वेगळी दिशा देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी सकारात्मकपणे काम केले पाहिजे. केंद्र व राज्य शासनाचा निधीतून करण्यात येणाऱ्या योजनांची जलदगतीने अमंलबजावणीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे केले.
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक आज जिल्हा नियोजन भवनात केंद्रीय राज्यमंत्री तथा समितीचे अध्यक्ष श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, खासदार राजन विचारे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार राजू पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, जिल्हा प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते आदी यावेळी उपस्थित होते.
सुमारे सहा तास चाललेल्या या बैठकीत राज्यमंत्री श्री. पाटील यांनी केंद्र पुरस्कृत योजनांच्या अमंलबजावणी, निधी वितरण, योजनांची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेले काम यांचा योजनानिहाय व यंत्रणानिहाय आढावा घेतला. ठाणे जिल्हापरिषद, जिल्हा नियोजन समिती, जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा/नगरपंचायती यांच्यासह सिडको, एमएमआरडीए, महावितरण, रेल्वे, म्हाडा, प्रदुषण नियंत्रण मंडळ, अन्न व औषध प्रशासन आदी विभागांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
श्री. पाटील म्हणाले की, केंद्र शासन अनेक योजनांना निधी देतो. या निधीतून करण्यात येणारी कामे वेळत व दर्जेदार व्हावीत. तसेच या योजना राबविताना त्यांचा जनतेला किती फायदा होतो, यासंबंधी नागरिकांचे मत जाणून घ्यायला हवे. केंद्र शासनाच्या सुमारे 18 विभागाच्या 62 हून अधिक योजना गावपातळीपर्यंत पोचविता येतील. त्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे केंद्र पुरस्कृत योजनांसाठी माहिती पाठविताना ती वस्तुनिष्ठ असावी. जेणेकरून योजनांचा त्या भागाला फायदा मिळू शकेल.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ठाणे महानगरपालिका हद्दीत उभारण्यात येत असलेल्या शौचालयाच्या कामांची लोकप्रतिनिधींसोबत पाहणी करण्याचे निर्देशही श्री. पाटील यांनी यावेळी दिले.
खासदार श्री. सहस्त्रबुद्धे, खासदार डॉ. शिंदे, आमदार श्री. पाटील व आमदार डॉ. किणीकर यांनीही विविध कामांच्या संदर्भात सूचना केल्या.
जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी दिशा समितीच्या बैठकीचे महत्त्व विशद करून योजनांच्या अंमलबजावणीवर भर देण्यास सांगितले. तसेच कोवीडमुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात येणाऱ्या अनुदानासंदर्भात जनजागृती करण्यात यावे. तसेच देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक विभागाने नाविण्यपूर्ण विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. श्रीमती शिसोदे यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) गोपीनाथ ठोंबरे, जिल्हा शल्य चिकित्स डॉ. कैलास पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, भिवंडी निजामपूर नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी सुधाकर देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
