ठाणे, दि.31 : केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयाअंतर्गत खेलो इंडिया योजनेतून ठाणे जिल्ह्यामध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकाराचा समावेश असलेले प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी १२ वर्षाखालील मुले व मुली निवड चाचणीचे दि. ४ व ५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ०९.०० वाजता दादोजी कोंडदेव स्टेडियम बॅडमिंटन हॉल येथे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांनी कळविली आहे.
या प्रशिक्षण केंद्राकरीता १२ वर्षाच्या आतील १५ मुले व १५ मुलींची निवड करण्यात येणारअसून प्रशिक्षण केंद्र दादोजी कोंडदेव स्टेडियम, बॅडमिंटन हॉल येथे सकाळ व संध्याकाळ सत्रात सुरु राहणार आहे. बॅडमिंटन खेळाची निवड चाचणीसाठी भारतीय खेळ प्राधिकरणच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवंत शोध प्रक्रिया मानांकनाचा वापर करण्यात येणार आहे.
बॅडमिंटन निवड चाचणी मध्ये सहभागी होण्याकरिता १२ वर्षाआतील (मुले व मुली ) खेळाडूंचा जन्म दि.0१ डिसेंबर २००९ रोजी अथवा त्यानंतर जन्मलेला असावा.सहभागी होण्यासाठी खेळाडूने आधारकार्ड,जन्म दाखला सोबत आणणे बंधनकारक राहिल. अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक झुबेर शेख (९५११८२७२७) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती साळुंखे यांनी केले आहे.
