ठाणे, दि.31 : जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीकोनातून अन्न सुरक्षा व मानके कायदा अत्यंत महत्वाचा आहे. या कायद्याची ठाणे जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी आज दिले.
अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गतच्या जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक नुकतीच निवासी उपजिल्हाधिकारी श्री.सुदाम परदेशी यांच्याअध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोषी शिंदे,सहायक आयुक्त (अन्न) गजानन पाटील, उपाध्यक्ष ग्राहक संरक्षण सेवा समिती विजय ताम्हाणे, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या कायद्या संदर्भात ग्राहक संघटना व व्यापारी संघटनांनी मोठया प्रमाणात जनजागृती करावी .यासाठी सामान्य जनतेला समजेल अशाप्रकारे पत्रक तयार करुन ते जनतेपर्यंत पोहचविण्याबाबत श्री.परदेशी यांनी सुचना दिल्या.
या बैठकीमध्ये अन्न व्यवसायिकांना परवाना व नोंदणी प्रमाणपत्र घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेबाबतची माहिती सहायक आयुक्त (अन्न) धनंजय काडगे यांनी दिली.
