ठाणे दि. ३ जाने : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी अर्जुन मारुती गोळे यांची सोमवारी नियुक्ती झाली. यापूर्वी ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जल व्यवस्थापन विभाग पनवेल येथे सहाय्यक अभियंता श्रेणी १ पदी कार्यरत होते.
श्री. गोळे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन नोव्हेंबर २०१६ साली शासकीय सेवेत रुजू झाले. त्यांनी परिवेक्षाधीन कालावधीत जिल्हा परिषद गडचिरोली येथे काम केले आहे. ते मुळचे सातारा जिल्हातील गवडी गावचे रहिवासी असून त्यांनी एम.ई स्ट्रक्चर ( स्थापत्य ) या विषयात पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. तर शिवाजी विद्यापीठातून बी.ई. सिव्हील ही पदवी पूर्ण केली आहे.
जल जीवन मिशन अभियानाला गतिमानता आणणार
श्री. गोळे यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जल जीवन मिशन अभियानाला गतिमानता आणण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचे सांगितले. तसेच विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची कामे मार्गी लावण्यासाठी सध्यस्थिती जाणून घेऊन त्या योजना मार्गी लावण्यासाठी नियोजनबद्ध काम करणार असल्याचे सांगितले.
