सिडकोने प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा
– एकनाथ शिंदे
• नेरुळ व बेलापूर जेट्टीची केली पाहणी
• नगरविकासमंत्र्यांचा नवी मुंबई मेट्रोतून प्रवास
• खारघरच्या सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पास भेट
ठाणे, दि.3 : नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन नवी मुंबई मेट्रो, नेरुळ व बेलापूर जेट्टीसह इतर प्रकल्पांना भेटी दिल्या. सिडकोच्या वतीने सुरू असलेले प्रकल्पांचा दर्जा राखून ती वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी आज भाऊचा धक्का ते नेरूळ जेट्टी दरम्यान बोटीने प्रवास करून शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतू प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नेरूळ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या जेट्टीची पाहणी केली. त्याच ठिकाणी त्यांनी सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी खासदार राजन विचारे, विजय नहाटा, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, एस. एस. पाटील, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.
सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी सिडकोच्या वतीने सुरू असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. प्रधानमंत्री आवास योजना तसेच सिडकोच्या आवास योजनेतील घरांचे बांधकाम, प्रस्तावित नावडे येथील टाऊनशिप, नवी मुंबई विमानतळ, नैना विकास आराखडा, नेरुळ जलवाहतूक टर्मिनल, नेरूळ –बेलापूर-खारघर सागरी मार्ग, पाणी पुरवठा योजना, सांडपाणी पुर्नप्रक्रिया, खारघर येथील सेंटर ऑफ एक्सलन्स, वाशी येथील ठाणे खाडीपूल, पालघरमधील प्रशासकीय इमारती आदी प्रकल्पांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
नगरविकास मंत्री श्री. शिंदे म्हणाले की, देशातील सर्वात उत्कृष्ट अशा इमारती सिडकोने पालघर मुख्यालयाच्या रुपाने उभारल्या आहेत. पालघरप्रमाणेच नवी मुंबईतील प्रकल्पांची कामे दर्जेदार तसेच वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. सिडकोच्या वतीने उभारण्यात आलेल्या व पुढील काळात उभारण्यात येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर सरकत्या जिन्याची सोय करण्यात यावी. सिडकोच्या विविध प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात नवी मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. या प्रकल्पांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
