
ठाणे, दि. 04 : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2021 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 1 जानेवारी, 2022 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत पाठविता येणार आहेत. दि.1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400 025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2021 नियमावली व प्रवेशिका या शीर्षाखाली व ‘What’s new’ या सदरात ‘Late Yashwantrao Chavan State Literature Award 2021 Rules Book and Application Form या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णतः भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि 1 जानेवारी, 2022 ते 31 जानेवारी,2022 या विहित कालावधीत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक / प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400 025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक / प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य दि.1 जानेवारी, 2022 ते 31 जानेवारी,2022 या विहित कालावधीत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे. लेखक/ प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर / पाकीटावर ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2021 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी,2022 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर (दि.1 जानेवारी,2022 ते 31 जानेवारी, 2022) येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई सचिव यांनी कळविले आहे.
