ठाणे,दि.04(जिमाका) : राज्य शासनाकडे गेल्या काही दिवसांमध्ये कोव्हिड 19 पॉझिटीव्ह रुग्णांची तसेच ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद सातत्याने वाढत आहे, ही वाढ जागतिक स्तरावर अमेरिका आणि यूरोपातील देशात देखील होत आहे. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांत 88 ओमक्रॉन कोव्हीड – 19 च्या रुग्णांची नोंद झाली आहे. शासनाच्या असेही निदर्शनास आले आहे की, दररोज 1000 पेक्षा जास्त कोव्हीड – 19 रुग्णांची नोंद होत आहे. वरील वस्तुस्थिती विचारात घेता, राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध घालण्याचे ठरविले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी आपल्या अधिकारामध्ये, कोव्हिड – 19 विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी निर्बंध लावण्याच्या संबंधातील राज्य शासनाच्या यापूर्वीचे आदेशांचे अधिक्रमीत करून, सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व मनोरंजन विषयक क्षेत्रातील कार्याना, लग्न समारंभ कार्यक्रम आणि इतर सणांच्या वेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी होणे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना म्हणून कोव्हिड -19 सार्वजनिक साथीचे रोग येण्यापूर्वी सुधारीत मनाई आदेश निर्गमीत करण्यात येत आहे.
खालील आदेश ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये दि. 31/12/2021 पासून पुढील आदेशापर्यंत लागू करीत आहे.
लग्न समारंभा दरम्यान बंदिस्त जागा, किंवा मोकळ्या जागेत एकूण उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्ती इतकी मर्यादीत. सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्य तसेच मेळाव्यांच्या बाबतीत बंदिस्त जागा किंवा मोकळ्या
जागेत एकूण उपस्थितांची संख्या 50 व्यक्ती इतकी मर्यादीत राहील. अंतिम संस्काराच्या बाबतीत एकूण उपस्थितांची संख्या 20 व्यक्ती इतकी मर्यादीत राहील. ठाणे पोलीस आयुक्तालयात पर्यटकांचे केंद्र किंवा अशा जागा ज्या ठिकाणी मोठया प्रमाणात जनसमुदाय आकर्षित होवू शकतो. (जसे समुद्र किनारे, खुले मैदान इत्यादी.) अशा ठिकाणी यापूर्वी दिलेल्या सुचना पुढील आदेश पावेतो अंमलात राहतील. सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान
संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहिल. उपरोक्त ठिकाणे / कार्यक्रम येथील संबंधित ट्रस्टी व आस्थापना व्यवस्थापक यांना प्रत्येकास आदेशापुर्वी स्वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश हा एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसारमाध्यमे, पोलीस स्टेशन, सहा. पोलीस आयुक्त तसेच परिमंडळीय पो.उप आयुक्त कार्यालय यांचे नोटीस बोर्डावर नागरीकांचे सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे ठाणे शहर पोलीस आयुक्त, जय जीत सिंह कळविले आहे.
