ठाणे,दि. 04 : केंद्र शासनाने सन 2021-2022 या वर्षापासून पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नवीन सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेंतर्गत शेळी मेंढी पालन, कुक्कुट पालन, वराह पालन तसेच पशुखाद्य व वैरण विकासाअंतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती आणि वैरण बियाणे उत्पादन या योजनांकरिता 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अनुदानाची अधिकतम मर्यादा शेळी मेंढी पालना करीता रु.50 लक्ष, कुक्कुट पालनाकरीता रु.25 लक्ष, वराह पालनाकरीता रु.30 लक्ष आणि पशुखाद्य व वैरण विकासासाठी रु.50 लक्ष अशी आहे. स्वहिस्सा व्यतिरिक्त उर्वरित आवश्यक निधी बँकेकडून कर्जाद्वारे उपलब्ध करुन घ्यावयाचा आहे.
सदर योजनेचा लाभ व्यक्तीगत व्यावसायिक, स्वयसहायता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी, सहकारी दूध उत्पादक संस्था, सह, जोखीम गट (जेएलजी), सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्ट अप ग्रुप इत्यादी घेवू शकतात.
सदर योजनांच्या लाभाकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा असून योजनेच्या मार्गदर्शक सूचना, वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न, अर्जाचा नमुना इत्यादी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळ https://ahd.maharashtra.gov.in व केंद्र शासनाच्या संकेतस्थळ https://www.nim.udyamimitra.in यावर उपलब्ध आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, ठाणे, मुख्यालय-मुलुंड यांनी कळविले आहे.
