ठाणे दि. 06 :- शासकीय सेवेतील निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच यासंदर्भातील शासन निर्णयांची माहिती व्हावी, यासाठी आज ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांची कार्यशाळा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. अनुकंपा नियुक्तीची प्रकरणे संवेदनशीलपणे व वेळेत पूर्ण करण्यात यावेत, अशा सूचना श्री. परदेशी यांनी यावेळी केल्या.
जिल्हा नियोजन भवनात झालेल्या या कार्यशाळेस तहसीलदार राजेंद्र चव्हाण, सिंधु खाडे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी अनुकंपा नियुक्तीबाबत आतापर्यंत राज्य शासनाकडून घेण्यात आलेले निर्णय व परिपत्रक यांची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. शासन निर्णयातील तरतुदी व प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणींसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.
श्री. परदेशी म्हणाले की, राज्य शासनाचे आपलेच कर्मचारी निधन पावल्यानंतर त्यांच्या कुटुंबांना धीर देण्यासाठी व या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांचा वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी फक्त गट क व गट ड मधील कर्मचाऱ्यांनाच याचा लाभ घेता येत होता. मात्र राज्य शासनाने आता गट अ व गट ब च्या अधिकाऱ्यांसाठी सुद्धा हे धोरण लागू केले आहे. निधन पावलेले अधिकारी/कर्मचारी हे आपलेच सहकारी असतात. त्यामुळे त्यांच्या वारसांना नियुक्ती देण्यासंदर्भात संवेदनशीलपणे व विहित कार्यपद्धतीत काम करावे. अनेकवेळा यासंदर्भातील कार्यपद्धती, शासन निर्णयांची व परिपत्रकांची संपूर्ण माहिती नसल्यामुळे अशा प्रकरणात नियुक्ती देण्यास विलंब होतो. त्यामुळे ठाणे जिल्हा प्रशासनाने ही कार्यशाळा घेतली आहे.
जिल्हा प्रशासनाकडे अनुकंपा नियुक्तीसंदर्भातील सामायिक यादीतील वारसांना शासन सेवेसाठी आवश्यक प्रशिक्षण घेण्यासंदर्भात लवकरच मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. जेणेकरून प्रशासनालाही प्रशिक्षित व आवश्यक अर्हता असलेले उमेदवार मिळतील, असेही श्री. परदेशी यांनी यावेळी सांगितले.
तहसीलदार श्री. चव्हाण व श्रीमती खाडे यांनी यावेळी उपस्थितांच्या शंकांचे व प्रश्नांचे निराकरण केले


