ठाणे, दि. 7 : भारत निवडणूक आयोगाने दि. 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 05 जानेवारी 2022 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या 1 लाख 70 हजार 699 एवढी असून जिल्ह्यात आता एकूण मतदारांची संख्या 64 लाख 66 हजार 798 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.
ठाणे जिल्हयामध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 1 जानेवारी 2022 पूर्वी व विशेष संक्षिप्त कार्यक्रमानंतर ठाणे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण (जेंडर रेशिओ) 841 वरून 843 झाले आहे. दि. 5 जानेवारी 2022 रोजी जिल्ह्यात एकूण मतदार 64 लाख 66 हजार 798 असून त्यात महिला मतदारांची संख्या 29 लाख 57 हजार 14 तर पुरूष मतदारांची संख्या 35 लाख 9 हजार 42 आहे. इतर मतदारांची संख्या 742 आहे, असे जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी सांगितले.
दरम्यान, मतदार नोंदणी कार्यक्रमात 1 लाख 70 हजार 699 एवढ्या मतदारांची वाढ झाली असून त्यामध्ये महिला 81 हजार 676 तर पुरूष 88 हजार 784 आहेत व इतर मतदारांची संख्या 239 आहे.
दि.1 जानेवारी 2021 रोजी ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेले 8 लाख 35 हजार 508 इतके मतदार होते. मागील एक वर्षामध्ये कोरोना सदृश्य परिस्थिती असताना देखील जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी कार्यालयमधील अधिकारी, कर्मचारी तसेच बीएलओ यांच्या प्रयत्नाने स्थलांतरित झालेल्या व छायाचित्र नसलेल्या 5 लाख 10 हजार 301 इतक्या मतदारांची वगळणी करण्यात आली आहे.
महानगरपालिका,नगर परिषद व नगर पंचायत यांच्या निवडणूकीसाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणी व्हावी यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांनी SVEEP कार्यक्रमाच्या प्रभावी अमंलबजावणीचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. नार्वेकर यांनी ठाणे जिल्हयातील नवी मुंबई, कल्याण डोंबिवली येथील राजकीय पक्षांची बैठक घेवून त्यांना जास्तीत जास्त मतदार नोंदणीसाठी सहकार्य करण्यासाठी विनंती करण्यात आली होती.
मतदार नोंदणी जनजागृतीसाठी ठाणे शहारातील रेल्वे स्थानक, बस स्थानक, घंटा गाडी, तीन चाकी गाडी यांचे द्वारे प्रसिद्धी देण्यात आली होती. तसेच स्वीप कार्यक्रमांची विविध माध्यमांद्वारे संदेश, मालमत्ता कर पाणीपट्टी देयकावर संदेश छापून जनजागृती करण्यात आली. स्थानिक संस्थांच्या कार्यलयात कम्युनिटी फॅसिलीटी सेंटर (CFC) सुरू करून तेथे भेट येणाऱ्या अभ्यागतांना वोटर हेलपलाईन ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याच्या सुविधांबाबतची माहिती देण्यात आली, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी सांगितले.
जिल्हा एडस् प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रतन गाढवे यांच्याशी सलग्न असलेल्या तृतीय पंथी व वंचित घटकातील महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांची बैठक घेण्यात आली. त्याद्वारे वंचित घटकांतील मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. भिवंडी, उल्हासनगर व कल्याण येथे शिबिरे आयोजित करण्यात आली. ठाणे जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 742 तृतीय पंथी मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. अन्य जिल्हयांच्या तुलनेत ठाणे जिल्हयामध्ये सर्वात जास्त तृतीय पंथीय मतदारांची नोंदणी झाली आहे.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा दरम्यान सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये नवमतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम, नवीन गृहनिर्माण सोसायटी, वंचित महिला, तृतीयपंथी, आदीवासी पाडे, मोठमोठ्या औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठका जिल्हास्तरावर घेण्यात आल्या. मतदार नोंदणी करण्यासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय विशेष शिबिरांचे नियोजन करून कार्यक्रमांची आखणी करुन देण्यात आली. या कार्यक्रमांचे आयोजन संबंधित विधानसभा मतदारसंघ व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांचे स्वीप नोडल अधिकारी यांचे समन्वयाने पार पाडण्यात आले

