ठाणे, दि. २५ : निवडणूक प्रक्रिया सर्वसमावेशक होण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक मतदार यादीत येण्यासाठी जिल्हा यंत्रणा प्रयत्न करीत आहेत. नवमतदारांची संख्या वाढवितानाच मतदार याद्यांमध्ये ज्यांची छायाचित्रे नाहीत अशा सुमारे ८ लाख मतदारांचे पंचनामे करण्याचे शिवधनुष्य यंत्रणेने पेलले, अशी भावना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज येथे व्यक्त केली.
जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत नियोजन भवनमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, रोहयो उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, पुर्नवसन उपजिल्हाधिकारी रेवती गायकर आदी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा देऊन श्री. नार्वेकर यावेळी म्हणाले, निवडणूक आयोगाचे कार्य हे आधुनिक भारतातले महत्वाचे कार्य आहे. देशातील निवडणूक प्रक्रिया निर्दोषपणे पार पडत असल्याने त्यातून लोकशाही बळकट करण्याचे काम होत आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये सुमारे दोन लाख नवमतदार वाढले असून त्यासाठी जिल्हा यंत्रणनेने मतदार जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणावर राबविले. जिल्ह्यात प्रथमच तृतीयपंथी मतदारांची नोंदणी करण्यात आली. मतदार यादीतील सुमारे ८ लाख मतदारांचे पंचनामे करण्याचे शिवधनुष्य यंत्रणेने पेलले त्यातून ज्यांची छायाचित्रे नाहीत अशा मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया करण्यात आली.
सर्वसमावेशक निवडणूका होण्यासाठी मतदार यादी हा पाया आहे, तो भक्कम करण्यासाठी आणि समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश मतदार यादीत करून सर्वांना या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत करण्यात आल्याचे श्री. नार्वेकर यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार डॉ. निरगुडकर यांनी सांगितले की, मतदार नोंदणीच काम जेवढ कठीण त्याहून अधिक कठीण काम बोगस मतदार बाहेर काढण्यांच आहे. निवडणुक आयोग हे आधुनिक भारताच्या निर्मितीतील तीर्थक्षेत्र असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार जनजागृती मोहिमेतून मतदानाविषयीची नकारात्मकता कमी होण्यास मोठी मदत होते, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी देशातील निवडणूक प्रक्रिया, मतदानाची टक्केवारी आदीबाबत सविस्तर विवेचन केले.
जिल्ह्याचे दिव्यांग आयकॉन व दिव्यांग मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करणारे अशोक भोईर, तृतीयपंथी मतदारांची नोंदणीसाठी प्रयत्न करणाऱ्या तमन्ना केणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वरद रानडे, वेदांत भागवत, अथर्व घोसाळकर, जागृत दाभोळकर या नवमतदारांना तर शहनाज सुलतान या तृतीयपंथी नवमतदाराला मान्यवरांच्या हस्ते मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.
कोरोना काळात मतदार नोंदणीसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून राजू थोटे, अभिजीत भांडे-पाटील यांचा सत्कार करण्यात आला. अधिक पाटील, सुरेंद्र टाकूर, आकाश निगडे यांचा उत्कृष्ट सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून सत्कार करण्यात आला. नायब तहसीलदार स्मितल यादव, शीला आडे, समता सुर्वे, महसुल सहायक सुदीप किरपण, तुकाराम गवळी, काशीनाथ जाधव, प्रविण मुंडे, दीपक कडानिया आणि संगणक चालक अविनाश सासे, अमीत दिनकर, अनिकेत भावरे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांचा राष्ट्रीय मतदार दिनानिमित्तचा संदेश यावेळी प्रसारीत करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्तच्या सामुहिक प्रतिज्ञापत्राचे वाचन केले. नायब तहसीलदार स्मितल यादव यांनी प्रास्ताविक केले. तहसीलदार श्री. लोखंडे यांनी आभार मानले.



