ठाणे दि. 02 :- सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी माहिती दि. 28 फेब्रुवारी 2022 अखेरपर्यंत ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता ह. जावळे यांनी कळविले आहे.
ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी मनुष्यबळाची सांख्यिकी माहिती विहित नमुना ई आर -1 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार डिसेंबर अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी सर्व आस्थापनांनी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्याकडील अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी. हे तिमाही विवरणपत्र सादर करण्याची मुदतवाढ देऊन अंतिम तारीख 28 फेब्रुवारी, 2022 आहे. आस्थापनांनी आपल्या आस्थापनेचा नोंदणी तपशील (Employer Profile) देखील आवश्यक ती माहिती नोंदवून तात्काळ अद्ययावत करावी. यासंदर्भात अधिक माहितीसाठी thanerojgar@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती जावळे यांनी केले आहे.
