


ठाणे दि. 02 :- ठाणे जिल्ह्यातील तीन खेळाडूंना जिल्हा क्रीडा पुरस्कार घोषित झाले असून पॉवरलिफ्टिंग खेळाडू शरद यादव व जिम्नॅस्टिकपटू नेहा दांडेकर यांना गुणवंत खेळाडू म्हणून तर ॲथलेटिकपटू श्रीनिवास गुप्ता यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात येणार आहे. येत्या शुक्रवारी, 4 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू (महिला व पुरुष) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे योगदान व मूल्यमापन होऊन त्यांच्या गौरव सोहळा व्हावा या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येते. 2020-21 साठी जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ठाणे जिल्ह्यातून तीन जणांची निवड जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा पुरस्कार निवड समितीने केली आहे. पुरस्कारचे स्वरूप रोख रक्कम रु.10,000/- सन्मानचिन्ह व गौरव पत्र असे आहे. दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी सायं 04.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून ठाणे जिल्ह्याचे नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल पॉवरलिफ्टिंग खेळाडू शरद श्रीरंग यादव यांना गुणवंत खेळाडू (पुरुष) म्हणून निवड करण्यात आली आहे.
जिम्नॅस्टिक खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून ठाणे जिल्ह्याचे नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल कु. नेहा समीर दांडेकर हिला महिला गुणवंत खेळाडू म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.
गेल्या दहा वर्षात ठाणे जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय पदक प्राप्त ॲथलेटिक्स खेळाडू घडवून आणल्याबद्दल मार्गदर्शक श्रीनिवास छोटेलाल गुप्ता यांना गुणवंत मार्गदर्शक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती साळुंखे यांनी दिली आहे.
