—————————————-
अनुकंपाधारकांचा उस्फुर्त प्रतिसाद; शंकांचे समाधानकारक निराकरण
ठाणे दि.३: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने जिल्हा परिषदेकडून गुरुवारी अनुकंपाधारकांसाठी अनुकंपा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागामार्फत हा मेळावा ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी शंभराहून अधिक अनुकंपाधारकांच्या अनुकंपा तत्त्वांतर्गत संधी व अनुषंगिक तांत्रिक बाबींच्या शंकाचे समाधानकारक निराकरण केले.
ठाणे जिल्हा परिषदेच्या सेवेत कार्यरत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र एका वारसास शैक्षणिक अर्हता व उपलब्ध संधीनुसार अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घेतले जाते. जिल्हा परिषदेंतर्गत अनुकंपाधारकांना सेवासंधी व त्या संदर्भातील नियम यांविषयी अवगत करून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशाने अनुकंपाधारकांसाठी ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित अनुकंपाधारकांना सेवेच्या विविध संधी तसेच इतर शासकीय नियम याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शासन निकषानुसार उपलब्ध पदे व त्यासाठी सेवाप्रवेश नियमानुसार आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता यांविषयी मेळाव्यात माहिती देण्यात आली.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी सरळसेवा संवर्गातील पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हतेबाबत माहिती देत अनुकंपाधारकांचे प्रश्न व शंका जाणून घेतल्या. या शंकांचे निराकरण करून अनुकंपा प्रक्रियेबाबतच्या शासन निर्णयांमधील तरतुदींची विस्तृत माहिती श्री.फडतरे यांनी दिली. त्याचबरोबर अनुकंपाधारकांना लवकरात लवकर नियुक्तीसाठी त्यांनी वाढीव शैक्षणिक व अन्य कौशल्यविकास अभ्यासक्रम पूर्ण करण्याबद्दल श्री.फडतरे यांनी प्रोत्साहित केले. हा मेळावा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी सहाय्यक प्रशासन अधिकारी शुभांगी रावत, वरिष्ठ सहाय्यक समीर राऊत, तांत्रिक सहाय्यक सल्लागार शुभांगी देसाई यांनी सहकार्य केले.
