ठाणे दि. ४ : जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) अभियानांतर्गत ग्रामीण भागात तब्बल २३८ सार्वजनिक शौचालय बांधण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन आपल्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठीचे प्रस्ताव १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत जिल्हा कक्षास सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) अभियान जिल्हा परिषदेमार्फत राबविले जाते. या अभियानाच्या माध्यमांतून गावोगावात विविध स्वच्छतेची कामे केली जातात. सन २०२१ -२२ या आर्थिक वर्षासाठी सार्वजनिक शौचालय वार्षिक कृती आराखड्यामध्ये जिल्हास २३८ सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी मंजुर आहेत. त्यापैकी प्रत्येक्षात ४५ शौचालयास मंजुरी मिळाली असून २८ शौचालयाची कामे पूर्ण झाली आहेत तर १७ सार्वजनिक शौचालयाची कामे प्रगतीपथात आहेत. अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ यांनी दिली.
जिल्हातील ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात वर्दळीची ठिकाणे, आठवडी बाजार, पर्यटन स्थळ, बस स्थानक आहेत अशा ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची नितांत आवश्कता असते. विशेष करून महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची सोय असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतमध्ये जागेची आणि पाण्याची उपलब्धता आहे, अशा ग्रामपंचायतींनी गट विकास अधिकारी यांच्या मार्फत सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठीचे प्रस्ताव स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) च्या जिल्हा कक्षास दिलेल्या मुदतीत सादर करायचे आहेत. सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी ३ लाख रुपये देय असून स्वच्छ भारत मिशनमधून २ लाख १० हजार तर पंधराव्या वित्त आयोगाकडून नव्वद हजारांरुपये खर्च करण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे.


