




खडवली, दि. ३१ जाने :- हळदी कुंकू हा स्त्रीयांचा कार्यक्रम अलिकडच्या काळात खुपच मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय.त्यात मोठ्या संख्येने स्त्रीया हजेरी लावत असतात. पण केवळ एकत्र जमुन हळद-कुंकु लावण्यापेक्षा या कार्यक्रमात वैचारिक प्रबोधन व मार्गदर्शन कसं करता येईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन या कार्यक्रमाचे आयोजन वावेघर येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला स्वराज्यजननी व आदर्शमाता जिजामाता यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करुन जिजाऊंच्या लेकींनी सुश्राव्य जिजाऊवंदना सादर केली.
यानंतर कार्यक्रमाच्या सुरवातीला सौ.करुणा पाटील यांनी हळदी- कुंकु हा समता व स्नेहभाव वृध्दींगत करण्याचा कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमामध्ये विधवा, परितक्त्या यांनाही निमंत्रित केले पाहिजे तसेच प्रत्येक स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समान असला पाहिजे असे बहुमोल विचार मांडले. त्याला उपस्थितांकडुन भरघोस प्रतिसाद मिळाला.
ह्या नंतर स्वाती शेलार व राजश्री गोतरणे यानि सर्व स्त्रियांना हळद कुंकू लावून एकमेकांप्रती आदरभाव व्यक्त केला.
या कार्यक्रमप्रसंगी खास करुन उपस्थित असलेले सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी श्री.प्रकाश मातळ यांनी महिलांना सॅनिपॅडचे महत्व सांगुन आरोग्यासंबंधी उपयुक्त मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सौ.सुवर्णा दिनकर व करुणा पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून महिलांचे उद्बोधन केले तर महिलांच्या सक्षमीकरणास नक्कीच हातभार लागेल.
हळदी कुंकूच्या कार्यक्रमानिमित्ताने महिलांमध्ये आपल्या आरोग्य,रोजगार,सामाजिक समस्या या विषयांबाबत जागृती होण्यास मदत होणार आहे.त्यामुळे सर्वांना भावलेल्या या अनोख्या हळदी कुंकू समारंभामुळे एक नवी दिशा समाजाला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
