महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा पंधरवडा संपला. शनिवारी सुट्टी होती. खूप दिवसांपासून बदलापूर येथे जाण्याचे ठरवले होते. तो योग जुळून आला आणि साहित्य गौरव ग्रंथालय, बेलवली-बदलापूर पश्चिम येथे पोहोचलो. ग्रंथालय ज्ञान पर्यटन म्हणून प्रत्येक मराठी माणसाने या ठिकाणी मुद्दाम गेले पाहिजे. अशी समृध्द ज्ञान वास्तू येथे आहे. मी खूप दिवस याबद्दल ऐकून होतो. तिथे पोहोचेपर्यंत मला ‘नॉर्मल’ ग्रंथालय असेल अशीच भावना होती. परंतु पायरीवरच ‘दादा साहेबांना समर्पित’ असे शब्द स्वागत करतात आाणि पुढे काही तरी वेगळं पहायला मिळेल याची जाणिव होत जाते. तसे प्रत्यक्षात दिसू ही लागते.
मराठी माणूस नेहमीच वाचन संस्कृती, अभिरुचीसंपन्नता आणि बौध्दिक मनोरंजनासाठी पुढे असतो. यात लहान-मोठे अनेक प्रयोग सतत होत राहतात. मात्र बदलापूरचे साहित्य गौरव ग्रंथालय हे एक बदलत्या वाचन संस्कृतीला टिकवणारे ‘माहेरघर’ ठरावे असे आहे. म्हणूनच मुद्दाम गेलो. सोबत दयानंद कांबळे, डॉ.संभाजी खराट आणि स्थानिक पत्रकार संजय साळुंखे, गिरीश त्रिवेदी उपस्थित होते.
कॅप्टन आशिष दामले आणि ‘ग्रंथसखा’चे शाम जोशीसर यांच्याशी मस्त गप्पा झाल्या. ग्रंथालयात गेल्यानंतरची सजावट तर अगदी उत्तमच नव्हे तर अन्य ग्रंथालयांनी अभ्यासावी अशी आहे. लेखक, पुस्तकाचे नांव, आवृत्ती आणि लेखकाचे फोटो, ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त लेखकांच्या पुस्तकांचे वेगळे दालन, स्पर्धा परिक्षांसाठीची स्वतंत्र अभ्यासिका यासह महत्त्वाचे म्हणजे, उत्तम अशी प्रकाशयोजना यासर्व गोष्टी सहजपणे नजरेस भरतात. वाचकांना सोयीची होईल अशी विषय आाणि भाषावार बैठक रचना तेथे आहे.
‘ग्रंथसखा’ची चळवळ आता साऱ्यांना ठाऊक आहे. दुर्मिळ ग्रंथांचे कलेक्शन सहजपणे येथे उपलब्ध होते. त्याची फोटोकॉपी देखील मिळते. मला गेल्या 25 वर्षात विविध ग्रंथालयात जाण्याचा योग आला. तेथील ग्रंथापाल किंवा व्यवस्थापक कसे विचित्र ‘साहित्य व्यवहार’ करतात हे देखील जवळून पाहता आले. मात्र या ग्रंथालयात वाचकाचे ‘समुदपदेशन’ केले जाते, त्याच्या आवडी निवडी नुसार लेखक आणिा पुस्तकं कोणती वाचावीत हे सांगितले जाते.‘ग्रंथ वेडे आंबेडकर’ हे दुर्मिळ पुस्तक यु.पी.इंगोले यांनी लिहिलेले आहे ते चाळता आले. अशी असंख्य दुर्मिळ पुस्तकं येथे आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी किमान 200 च्यावर विविध पुस्तके या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. 3 मे 1927 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘त्रिशत सांवत्सरिक श्री शिवाजी उत्सवात’ अध्यक्षीय भाषण बदलापूरात केल्याचा पुरावाही या ग्रंथालयातील पुस्तकात उपलब्ध आहे.
संगीत क्षेत्रातील भारतरत्न लता मंगेशकर यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. ग्रंथालयात असतांनाच त्यांना पून्हा रुग्णालयात दाखल केल्याची बातमी सुरु होती. पुस्तकांचे दालन पाहत असतांना ग्रंथपाल श्रीमती अर्चना कर्णिक यांनी ‘संगीतरत्न अब्दुल करीम खाँ’ यांचे जीवन चरित्र मला दाखविले. दुर्मिळ ग्रंथ सहजपणे पहायला, वाचायला मिळणे ही खूप मोठी उपलब्धी या ग्रंथालयात आढळते. काही तासात ही पाहणी संपणारी नाही. हे मात्र ध्यानी घ्यावे.
वाचन संस्कृती वाढावी म्हणून अनेक उपक्रम येथे राबविले जातात. माध्यमं बदलात म्हणून नव्यापिढीने नव्या तंत्रज्ञानानुसार वाचन करावे यासाठी किंडल सारखे किंवा ऑडीओ बुक सारखे उपक्रमही यात केले जात आहेत. ग्रंथाचे डिजीटलायझेशनही सुरु आहे
या ग्रंथालयाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘उत्तम’ असे संदर्भ ग्रंथालय असेच वर्णन करावे लागले. सुसंस्कृत आणि अभिरुची संपन्न समाजासाठी पुस्तकांची उपलब्धी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्रात दिवाळी अंकांची मोठी परंपरा आहे. दिवाळी अंक वाचन ही अनेक घरातली संस्कृती आहे. 300 पेक्षा अधिक दिवाळी अंक येथे पाहावयास मिळतात. लोकप्रिय अंक जसे आहेत तसे विविध विषयाला वाहिलेले अंक देखील या लहानशा गावात दिसतात. महात्मा गांधी आणि डॉ.राम मनोहर लोहीया विशेषांक असलेला ‘परंतु’चा दिवाळी अंक असो की, ‘मी’चा पैसा विशेषांक, ‘पाणी’ विशेषांक, वाघूरचा ‘सायकल’ विशेषांक असे नविनतम प्रयोग येथे वाचावयास मिळतात.
मराठीतील पहिली कादंबरी ‘मुक्तमाला’ लक्ष्मण शास्त्री हळबे यांनी लिहिली. त्यांची प्रत हातात घेतांना खूपच वेगळा अनुभव आला. गुगलच्या मते हळबे, लक्ष्मण मोरेश्वरशास्त्री (1831- 12 मे 1904). महाराष्ट्रातील पहिले स्वतंत्र कादंबरीकार व अद्भुतरम्य कादंबऱ्यांचे अध्वर्यू. त्यांची कौटुंबिक माहिती उपलब्ध नाही. त्यांचा जन्म वेदशास्त्रसंपन्न कुटुंबात वाई (जिल्हा सातारा) येथे झाला. त्यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजे महालातल्या मठ या गावचे. उत्तर पेशवाईत त्यांचे पूर्वज वाई येथे येऊन स्थायिक झाले. त्यांचे घराणे वैदिक व वडील शास्त्री असल्यामुळे घराण्याच्या पठडीप्रमाणे त्यांचे संस्कृतचे अध्ययन वाई येथे घरीच झाले. अध्ययन पूर्ण झाल्यावर ते मुंबईस गेले. शास्त्रीपंडिताला शोभेसी विद्वत्ता असल्यामुळे मुंबईतील अनेक संस्थांशी त्यांचा संबंध आला. मुंबईतील इंदुप्रकाश या वृत्तपत्राशी व ते प्रकाशित करणाऱ्या इंदुविजय या कंपनीशी त्यांचा निकट संबंध होता. या वृत्तपत्राच्या प्रारंभीच्या व्यवस्थापकवर्गात ते होते. दादोबा पांडुरंग प्रभृतींनी स्थापन केलेल्या (1849) परमहंस मंडळीचेही ते सदस्य होते. परमहंस सभाही सुधारणांचा पुरस्कार करण्यासाठी विशेषतः जातिभेद नष्ट करणे व विधवांच्या पुनर्विवाहास संमती होती. या मंडळाच्या कार्यात लक्ष्मणशास्त्री आघाडीवर होते. वामनराव कोल्हटकर या तत्कालीन वाईकर गृहस्थांशी प्रथमपासूनच त्यांची घनिष्ठ मैत्री होती. इंदुप्रकाश या वृत्तपत्राबरोबरच त्यांचा ज्ञान-प्रसारक (1850) या मासिकाशी लेखक या नात्याने संबंध होता. ज्ञानप्रसारका त त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या होत्या. चंद्रिका (1854) या मासिकाचे ते संस्थापक–संपादक होते आणि 1856 मध्ये त्यांच्या रत्नप्रभा या कादंबरीची काही प्रकरणे त्यात प्रसिद्ध झाली होती. लक्ष्मणशास्त्री यांची पहिली कादंबरी मुक्तामाला (1861) आणि दुसरी रत्नप्रभा (1866) होय. मुक्तामाला या कादंबरीचे मूळ नाव मुक्तमाला असून चौथ्या आवृत्तीनंतर ते मुक्तामाला झाले. रत्नप्रभा ही कादंबरी त्यांनी अक्कलकोट संस्थानचे तत्कालीन रीजंट माधवराव विठ्ठल ऊर्फ दादासाहेब विंचुरकर यांस आदरपूर्वक नजर (अर्पण) केली होती. या दोन्ही कादंबऱ्या वाचकवर्गात लोकप्रिय झाल्या. बडोद्याचे संस्थानिक खंडेराव गायकवाड यांनी लक्ष्मणशास्त्री यांच्या मुक्तामाला या अद्भुतरम्य कादंबरीवर लुब्ध होऊन त्यांना वर्षासन चालू केले (1870). त्यांनी संखेडा तालुक्यात हरेश्वर गावाचा इस्तावा (सारा) त्यांना दिला होता. मुक्तामालापूर्वीच रत्नप्रभा या कादंबरीचे लेखन झाले होते, तरी ती त्यांनी नंतर फेरफार करून प्रसिद्ध केली. मुक्तामालाच्या प्रस्तावनेत लक्ष्मणशास्त्री लिहितात, “आमच्या लोकांस स्वभाषेंतील पुस्तकें वगैरे वाचण्याची गोडी लागावी या हेतूने यथामती हा ग्रंथ तयार केला आहे. ईश्वरी नियमास अनुसरून जे लोक नीतीने वागतात, त्यांस कितीही संकटे प्राप्त झाली तरी, ती सर्व दूर होऊन त्यांस शेवटी सुखच होते. ही गोष्ट स्पष्टपणे ध्यानात येण्याकरिता हा एक इतिहास लिहितो. मुक्तामाला या कादंबरीच्या आतापर्यंत बारा आवृत्त्या निघाल्या आहेत. तसेच 1916 मध्ये गुजराती भाषेत तिचा अनुवाद झाला आहे रत्नप्रभेच्या दोन आवृत्त्या निघाल्या. अशी माहिती मिळते. ह्या पुस्तकांची प्रत पाहून काय वाटले याचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही. त्या काळातही मराठी भाषा कशी होती हे पहायचे, अभ्यासायचे असेल तर बदलापूर इतके चांगले वाचनालय मिळणार नाही.
कोणतीही शासकीय मदत अथवा व्यापारी दृष्टीकोन प ठेवता ‘ग्रंथसखा’ आणि साहित्य गौरव ग्रंथालयाचे काम सुरु आहे. शाम जोशी सहजपणे माहिती सांगत होते. पुस्तकं वाचनं ही आपली संस्कृती आहे. कसं, काय, केव्हा वाचावं याचं मार्गदर्शन आम्ही करतो, मग लहान वाचक असो की संशोधक त्याला जे हवं ते उपलब्ध व्हावे यासाठी धडपड असते. पुस्तकाची दुर्मिळता आणि उपलब्धता ह्या भिन्न बाबी आहेत, विशेषत: त्या जतन करणे हे तर खूपच कठीण बाब आहे. लहान मुलांचे संगोपन जसे असते तसे पुस्तकांची हाताळणी देखील महत्त्वाची असते. ‘बुक टुरिझम’ करायचा
असेल तर बदलापूरात या एक दिवसच नव्हे तर, वाचक म्हणून प्रत्येक माणूस जोडला जावा अशी आमची इच्छा आहे. असे शाम जोशी सहजपणे सांगतात. यामागे त्याची खूप मोठी तळमळ आणि श्रम आहेत. त्यांच्या कार्याला सलाम.
बदलापूरला ‘निवासी वसाहतीचे’ शहर म्हणून ओळखले जाते. मात्र बदलापूर आता बुक टुरिझम आणि ग्रंथालय ज्ञान पर्यटन होत आहे. आपणही कधी गेलात तर अवश्य ‘साहित्य गौरव ग्रंथालय’, यशस्विनी भवन, बँक ऑफ इंडिया जवळ, बेलवली, कल्याण-बदलापूर रोड, बदलापूर पश्चिम येथे अवश्य भेट द्या. शाम जोशी आणि कॅप्टन आशिष दामले यांचीही भेट घ्या एवढंच!
———-
