ठाणे दि. 10 :- विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने समाजातील कमकुवत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब कुटुंबातील व्यक्तिंना मोफत कायदेविषयक सेवा पुरविण्यात येते. याअंतर्गत सन 2021 मध्ये 1057 नागरिकांनी ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मोफत कायदेविषयक सेवेचा लाभ घेतला आहे.
समाजातील गरजू नागरिक जसे की, तुरुंगातील कैदी किंवा पोलीसांच्या ताब्यात असलेली व्यक्ती, महिला व बालके, 60 वर्षे वयावरील व्यक्ती, अनुसूचित जाती व जमातीतील व्यक्ती, विविध प्रकारची आपत्ती, जातीय हिंसा, पूर, भूकंप पिडीत व्यक्ती, मानवी तस्करी, शोषण किंवा दिव्यांग व्यक्ती, औद्योगिक कामगार, मानसिक दृष्ट्या दुर्बल किंवा दिव्यांग व्यक्ती आणि वार्षिक उत्पन्न रूपये तीन लाखापर्यंत असलेल्या व्यक्ती यांना मोफत कायदेविषयक सल्ला व सहाय्य देण्यात येते. त्याअंतर्गत गरजू व्यक्तिंना सहाय्यासाठी विधीज्ञांची नियुक्ती करण्यात येते व त्यासाठी कोणत्याही पक्षकाराकडून शुल्क आकारले जात नाही.
ठाणे जिल्हा विजधी सेवा प्राधिकरणामार्फत देण्यात येणाऱ्या या मोफत कायदेविषयक सेवेचा सन 2020 मध्ये 687 नागरिकांनी व सन 2021 मध्ये 1057 नागरिकांनी लाभ घेतला आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी दूरध्वनी क्रमांक (022) 25476449 किंवा 8591903604 या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा ई-मेल legalaidthane@yahoo.com यावर संपर्क साधावा.
मोफत कायदेविषयक सेवांचा कैद्यांनी लाभ घ्यावा
समाजातील गरजू नागरिकांना मोफत कायदेविषयक सेवा मिळणे हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे. गरीब, कमकुवत व दुर्बल घटकातील व्यक्तिंना आर्थिक अडचणींमुळे न्याय मिळण्यास अडचणी होऊ नये, यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत कायदेविषयक सेवा देण्यात येतात. या सेवांचा जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी तसेच कारागृहात बंदिस्त कैद्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मंगेश देशपांडे यांनी केले आहे.
