ठाणे दि. 09 :- जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्यातून राज्यात राबविण्यात येत असलेल्या मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत समुदाय आधारित संस्थाकडून मूल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी 31 मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी दिली आहे.
स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत शेतमाल, शेळ्या (मांस व दूध) आणि परसबागेतील कुक्कुटपालन (अंडी) यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पासाठी शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाव्दारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र हे अर्ज करू शकतील. यासंदर्भातील अधिक माहिती, अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना इत्यादी माहिती www.smart-mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन डाउनलोड करुन आवश्यक कागदपत्रे जोडून सादर करावे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जिल्ह्याच्या प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालयात आणि लोकसंचलित साधन केंद्रांनी जिल्हा समन्वयक अधिकारी, माविम आणि प्रभाग संघांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक, एमएसआरएलएम यांच्या कार्यालयात ऑफलाईन पध्दतीने दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत सादर करावे. यापूर्वी ऑनलाईन अर्ज केलेल्या संस्थांनी पुनःश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.
