नवी मुंबई, दि.08 :- कोकण भवन येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ठाणे यांच्याकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेल्या अर्जांमधील त्रृटींची पुर्तता करण्यासाठी दि.25 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, भटक्या जाती प्रवर्गातील अर्जदारांनी त्यांच्या शैक्षणिक, नोकरी, निवडणूक आणि इतर प्रयोजनार्थ कोकण भवन येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ठाणे यांच्याकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर केले होते. त्यापैकी परिपूर्ण व सक्षम पुरावे असलेल्या अर्जांवर समितीने कार्यवाही करून जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहेत. परंतु अपूर्ण पुरावे असलेले अर्ज समितीस्तरावर अद्यापही प्रलंबित आहेत. ज्या अर्जदारांनी त्रृटींची पुर्तता अथवा सक्षम पुरावे समिती कार्यालयास प्रत्यक्ष व ऑनलाईन या दोन्ही स्वरुपात सादर केलेले नाहीत. अशा अर्जदारांना आपल्या अपूर्ण अर्जांमधील त्रृटींची पुर्तता व सक्षम पुरावे सादर करण्यासाठी दि.25 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने त्रृटींची पुर्तता न करणाऱ्या अर्जदारांना जात प्रमाणपत्र पडताळणीची आवश्यकता नाही. असे गृहीत धरून गुणवत्तेनुसार सदरचा अर्ज अथवा प्रकरण बंद करण्याची कारवाई समितीस्तरावरून करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. त्यानंतर अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यास सक्षम पुराव्यांसह समिती कार्यालयात नव्याने अर्ज सादर करावा लागेल. असे ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य वासुदेव पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
