ठाणे दि. 11 :- राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रतिभावंत खेळाडूंसाठी निवासी व अनिवासी प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे. त्याअंतर्गत क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळसेवेद्वारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरू झाली असून ठाणे जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळातील खेळाडूनी निवड चाचणीसाठी 11 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांनी केली आहे..
राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिभावंत खेळाडूंची निवड करून त्यांना क्रीडा प्रबोधिनीत शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, अद्यावत क्रीडा सुविधा पुरविण्यात येतात. या क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू झाली असून प्रत्येक जिल्हा व विभागवार कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार, राज्यस्तरावर पदक प्राप्त किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेल्या 19 वर्षाखालील खेळाडूची निवड करण्यात येणार आहे. यासाठी क्रीडाप्रकार निहाय कौशल्य चाचणी आयोजित करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यासाठी बॅडमिंटन या क्रीडा प्रकाराची निवड करण्यात आली आहे. दि. 18 फेब्रुवारीपर्यंत जिल्हास्तरावर अर्ज स्विकारण्यात येणार असून त्यानंतर 21 ते 25 फेब्रुवारी 2022 या कालावधीत विभागस्तरावरीय चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
विभागस्तरीय चाचण्यांसाठी ठाणे जिल्ह्यातील खेळाडूनी 18 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन श्रीमती साळुंखे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक तथा समन्वयक अधिकारी श्रीम. मधुरा सिंहासने (8652713456), क्रीडा मार्गदर्शक जुबेर शेख (9511827279), क्रीडा मार्गदर्शक महेंद्र बाभुळकर (7977001442) यांच्याशी संपर्क साधावा.
