कल्याण, दि. 11 :- कल्याण शहरात बाजारपेठेतील रस्ते अरूंद आहेत. शासनाने कल्याण शहर हे स्मार्ट सिटी म्हणून घोषित केले आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत बैलबाजार, बल्लीपीर ते महात्मा फुले चौक दरम्यान फ्लायओव्हर ब्रिजचे काम चालू झाल्याने सदर भागात ठिकठिकाणी खोदकाम करून पीलर (खांब) टाकण्याचे काम चालू आहे
या भागात वाहतुक सुरळीत व सुनिश्चित व्हावी तसेच नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी महात्मा फुले चौक, दिपक हॉटेल, पोस्ट ऑफिस ते पुष्पराज हॉटेल (महमद अली चौक) दरम्यान एक दिशा मार्ग (One Way) करण्यात आला असल्याची माहिती ठाणे शहर, वाहतूक विभाग पोलीस उप आयुक्त, बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
या मार्गावरील बदल खालील प्रमाणे आहे.
प्रवेश बंद :- पुष्पराज हॉटेल ते दिपक हॉटेल कडून कल्याण रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांना पुष्पराज हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. महात्मा फुले चौक ते पुष्पराज हॉटेलकडे जाणाऱ्या वाहनांना महात्मा फुले चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सदर दुचाकी व चार चाकी वाहने (कार, जीप, एस.टी./ केडीएमसी बसेस, लहान बसेस) ही पुष्पराज हॉटेल कडून सरळ पुढे जावून महात्मा फुले चौक येथून पुढे इच्छित स्थळी जातील. सदर दुचाकी व चारचाकी वाहने (कार, जीप, एस.टी./ केडीएमसी बसेस, लहान बसेस) ही महात्मा फुले चौक कडून सरळ पुढे जावून दिपक हॉटेल येथून पुढे इच्छित स्थळी जातील.
सदरची अधिसुचना प्रसिद्ध झाल्या तारखेपासून ते स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेल्या फ्लायओव्हर ब्रिजचे काम पूर्ण होईल पर्यंत लागुन करण्यात येत आहे. सदरची वाहतुक नियंत्रण अधिसुचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर यांनी कळविले आहे.
