ठाणे, दि. 28 : जिल्ह्यांतील नागरी क्षेत्रातील सेवा सुविधांसाठी विशेष अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्याला सन 2022-23 या वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेमध्ये (सर्वसाधारण) अतिरिक्त 143 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यस्तरीय बैठकीत ठाणे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 475 कोटी रुपयांच्या नियतव्ययामध्ये या विशेष निधीची भर पडली असून आता जिल्ह्याचा एकूण नियतव्यय 618 कोटी रुपयांचा झाल्याचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 18 जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन 2022-23 या वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी 395.81 कोटी, आदिवासी क्षेत्रातील योजनांसाठी 73.44 कोटी आणि समाज कल्याण विभागाच्या अनु.जाती उपयोजनांसाठी 72 कोटींच्या आराखड्यास यावेळी मंजुरी दिली होती.
त्यानंतर दि. 24 जानेवारी 2022 रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय नियोजन बैठकीत ठाणे जिल्ह्यासाठी 475 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, जिल्ह्यातील आमदार यांनी ठाणे जिल्ह्यातील वाढते नागरीकरण लक्षात घेता अतिरीक्त निधी मिळावा अशी मागणी केली होती.
जिल्ह्यात असलेल्या सहा महापालिका, वाढते शहरीकरण, आरोग्य सुविधा, ग्रामीण भागात जनसुविधांची कामे यासाठी वाढीव निधी द्यावा अशी मागणी पालकमंत्री श्री. शिंदे यांनी केली होती. निधी वाटपाच्या सुत्रानुसार सध्या ठाणे जिल्ह्यासाठी वाढीव 475 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय बैठकीत घेतला होता. भविष्यात मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून अजून निधी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले होते.
दरम्यान, नियोजन विभागाने दि. 21 फेब्रुवारी 2022 रोजीच्या पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांना सन 2022-23 या वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेचा अंतिम नियतव्यय कळविला आहे. राज्यात गतीने होत असलेले नागरीकरण लक्षात घेता जिल्ह्यांना नागरीकरणाच्या प्रमाणात जिल्हा वार्षीक योजनेंतर्गत सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांना विशेष अतिरिक्त नियतव्यय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यासाठी राज्यस्तरीय बैठकीत मंजूर झालेल्या 475 कोटी रुपयांच्या नियतव्ययामध्ये नागरी क्षेत्रातील सेवा सुविधांसाठी 143 कोटी रुपयांचा विशेष अतिरिक्त निधी मिळाल्याने जिल्ह्याचा एकूण मंजूर निधी आता 618 कोटी इतका झाल्याचे जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी सांगितले.
