
ठाणे, दि. 4 : स्वामी विवेकानंद यांनी जगात पहिल्यांदा भारतीय अध्यात्माची उंची दाखवून दिली. अश्या या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व च्या जीवनावरील नाटकाने आजच्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

ब्रह्म फाउंडेशन, पीतांबरी यांच्या वतीने आयोजित स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील ‘मी विवेकानंद’ या हिंदी नाटकाचा 150 वा प्रयोग श्री. कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी महामहिम श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी ब्रह्म फाऊंडेशनचे ॲड. बी. एल. शर्मा, राधिका क्रिएशनच्या श्वेता शालिनी, संजय पेंडसे, निखिल मुंडले आदी व्यासपीठावर उपस्थित होते. राधिका क्रिएशनने या नाटकाची निर्मिती केली आहे.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, समाजात छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांच्यासारखे प्रेरणा देणारे अनेक संत, महापुरुष निर्माण होत असतात. स्वामी विवेकानंद यांनी पहिल्यांदा जगभरात भारताची धर्म पताका आणि विजयी पताका फडकवली. त्यांनी आत्मविश्वास आणि स्वाभिमान जागविला. भारतीय अध्यात्मिक उंची किती महान आहे हे स्वामीजींनी जगाला दाखवून दिले. अशा या तपस्वीवर विदेशात जास्त लिखाण झाले आहे.
समाजासाठी, देशासाठी समर्पण करतो तेव्हाच ती व्यक्ति मोठी होते. त्यामुळे समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तिंचा गौरव व्हायला हवा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, ॲड. सुभाष झा, ओमप्रकाश शर्मा, हसमुख गहलोत, संजय पेंडसे, डॉ. सुशील इंदोरिया, राजेंद्र दधिच, संजय धुमाळ, पत्रकार अनिल शुक्ला, ॲड. ओमप्रकाश परिहार, महेश जोशी, महेश बागडा, ॲड. तरुण शर्मा, अशोक पारिख, सतीश बंका आणि रवि तिवारी यांचा समावेश होता.
बह्म फाऊंडेशनचे श्री. शर्मा यांनी प्रास्ताविक केले. श्री. मुंडले यांनी आभार मानले.
