ठाणे, दि. 8 : जिल्हा कामगार उपायुक्त कार्यालयामार्फत आझादी का अमृत महोत्सव निमित्त दिनांक 7 ते 13 मार्च या कालावधीत पेन्शन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त काल येथील काशीनाथ घाणेकर सभागृहात राज्यस्तरीय नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. रोहयो उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व ई श्रम नोंदणी/कार्ड वाटप/जनजागृती करीता यावेळी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी 10 नागरी सेवा केंद्र स्थापून सुमारे 300 हून अधिक कामगारांची नोंदणी करून त्यांना ई श्रम कार्ड/ युनिव्हर्सल पास/ हेल्थ कार्ड देण्यात आले. यावेळी नोंदणी व त्याच्या योजनेबाबाबत चर्चासत्र घेण्यात आले, असे कामगार उपायुक्त संतोष भोसले यांनी सांगितले.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालय, केंद्र शासन कामगार विभाग, राज्य शासन असंघटित कामगार विभाग, राज्य शासन कामगार विभाग, कामगार संघटना प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला.
