ठाणे, दि.22 : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात दि. 27 मार्च ते 2 एप्रिल 2022 या कालवधीत तृतीय पंथीय मतदार नोंदणी विशेष सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली.
दि.31 मार्च हा आंतरराष्ट्रीय तृतीय पंथीय ओळख दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने नोव्हेंबर 2020 मधील विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत तृतीय पंथीयांच्या नाव नोंदणीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेमुळे मतदार यादीतील त्यांची टक्केवारी वाढली. मात्र लोकसंख्येतील पात्र सर्व तृतीयपंथीय नागरिकांची नोंदणी करणे उद्दिष्ट असून तृतीय पंथीय ओळख दिनाच्या निमित्ताने त्यांच्या नाव नोंदणीसाठी प्रयत्न करून उद्दिष्टपूर्ती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मतदार संघांतर्गत तृतीय पंथीयांची संख्या अधिक असणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन त्या ठिकाणी दि. 27 मार्च ते 2 एप्रिल 2022 या सप्ताहामध्ये एक दिवसीय नाव नोंदणी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. मतदान नोंदणीपासून वंचित असणाऱ्या सर्व पात्र तृतीयपंथीय नागरिकांनी त्यात सहभागी होऊन नाव मतदार यादीत नाव नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन श्रीमती कदम यांनी केले आहे.
