ठाणे, दि. 24 :- एकाच अर्जावर कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या ‘एक शेतकरी एक अर्ज’ या उपक्रमास ठाणे जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या एक वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील 5 हजार 487 शेतकऱ्यांनी महाडिबीटी प्रणालीवर या उपक्रमाअंतर्गत नोंदणी केली असून आतापर्यंत 483 शेतकऱ्यांना त्यांच्या आधारसंलग्नित बँक खात्यावर 2.82 कोटी अनुदान देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी दिली आहे.
कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी कृषि मंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर विभागात अनेक नवीन उपक्रम सुरू केले. त्यातीलच एक नाविण्यपूर्ण उपक्रम म्हणजे ‘एक शेतकरी- एक अर्ज’ हा होय. शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करावा लागत होता. तसेच प्रत्येक अर्जासोबत सारखीच कागदपत्रे जोडावी लागत होती. यासाठी शेतकऱ्यांचा वेळ व पैसाही खर्च होत होता. यावर उपाय म्हणून कृषि विभागाने माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करुन महाडीबीटी प्रणालीच्या माध्यमातून ‘एक शेतकरी- एक अर्ज’ ही संकल्पना अंमलात आणली. या संकल्पनेअंतर्गत केवळ एकाच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या विविध योजनांचे लाभ घेता येऊ लागले आहेत. तसेच चालू आर्थिक वर्षात निवड झाली नाही, तर हाच अर्ज पुढील आर्थिक वर्षात ग्राह्य धरण्याची सुविधा देखील यामध्ये आहे. तसेच या प्रणालीव्दारे शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी घरबसल्या अर्ज करता येऊ शकते. त्याचप्रमाणे, आपल्या अर्जाची सद्य:स्थिती मोबाईल अॅपद्वारेही पाहता येते. विविध योजनांसाठी लागणारी सर्व कागदपत्रे देखील अपलोड करता येतात. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज आल्यास संगणकीय सोडतीद्वारे प्रत्येक तालुकानिहाय लाभार्थी शेतकऱ्यांची पारदर्शी निवड केली जाते.
या उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात 5,487 शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर नोंदणी केली असून वेगवेगळ्या योजनांतर्गत विविध घटकांची मागणी केली आहे. दि. 23 मार्च, 2021 रोजी या प्रणालीव्दारे पहिल्या शेतकऱ्यास अनुदान वितरित झाले होते व आज वर्षभरानंतर ठाणे जिल्ह्यातील एकूण 483 शेतकऱ्यांना कृषि विभागाने आधारसंलग्न बँक खात्यावर रु. 2.82 कोटी अनुदान प्रत्यक्ष डीबीटीव्दारे वर्ग केलेले आहेत. उर्वरित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु असून मार्च 2022 अखेर ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे श्री. वाघ यांनी सांगितले आहे.
या प्रणालीचा उपयोग जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी विशेष प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच यासंबंधी कृषी मंत्री तसेच कृषी आयुक्त यांच्यास्तरावरून वेळोवेळी आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे श्री. वाघ यांनी सांगितले.
