
ठाणे, दि. २६ : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने, विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर महाविद्यालयात स्त्री शक्ती सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलेल्या 75 विद्यार्थिनी व प्राध्यापिकांचा गौरव करण्यात आला. तसेच प्राचार्य डॉ. मोझेस कोलेट यांच्या अध्यक्षतेखाली, वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःची मोहोर उमटवणाऱ्या माजी विद्यार्थिनींचाही सत्कार करण्यात आला.
मार्च महिन्यात महिला दिनानिमित्त अनेक कार्यक्रम होतात. पण ती चाकोरी टाळून बांदोडकर महाविद्यालयाने, विद्यार्थिनींना दिशा आणि प्रेरणा देण्यासाठी यशवंत महिलांना आमंत्रित केले. यावेळी महाविद्यालयाच्या उप प्राचार्या डॉ. मैत्रेयी सहा, ठाणे जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी सौ. कदम मॅडम, नायब तहसीलदार स्मितल यादव, शास्त्रज्ञ जयंती कुलकर्णी, चंद्रिका मॅडम, लेखिका सृष्टी गुजराथी, सहदेवी मोझेस, डॉ. अल्पना बापट, विप्रमच्या विश्वस्त सुमेधा बेडेकर, करुणा घरच्या संस्थापिका बेलिंडा परेरा, उद्योजिका स्मिता गिरी, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. श्रीविद्या जयकुमार, जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी अनुभव कथन केले.
स्वतःला अबला समजू नका आणि दुर्गाही म्हणवू नका. समाजाच्या चष्म्यातून स्वतःला पाहू नका. स्वतःला ओळखा. जे करावेसे वाटेल ते करून पहा. आजच्या जगण्याचा आनंद घ्या. इतरांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःचे अस्तित्व विसरू नका. असा संदेश सृष्टी गुजराथी यांनी उपस्थित विद्यार्थिनींना दिला.
इतरांशी स्पर्धा करत बसू नका. स्त्री – पुरुष संघर्ष नको. समन्वय साधा. आपली आवड जोपासा, त्यासाठी कष्टाची तयारी ठेवा, असा सल्ला जयंती कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी विद्यार्थिनींनी बिग्रेडीअर एस. व्ही. सरस्वती यांची दृक्श्राव्य माध्यमातून मुलाखत घेतली. संस्थेच्या थोरले बाजीराव पेशवे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मान्यवर महिलांचा स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसोबत राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थीही मोठ्या संख्यने उपस्थित होते.

