ठाणे दि. 26 : जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधत मुंब्रा-कौसा भागातील क्षयरोगावर मात करून निरोगी जीवन जगणाऱ्या नागरिकांना चॅम्पियन म्हणून बहुमान देत, सन्मान करण्यात आला. ठाणे महानगरपालिका , जॉन्स अँड जॉन्स कंपनी यांच्या सहकार्याने मुंब्रा-कौसा भागात क्षयरोगाच्या प्रतिबंधक उपाययोजनांवर काम करणाऱ्या झेडएमक्यू संस्थेने गुरुवारी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी क्षयरोगाविषयी वैद्यकीय माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर हेमलता, प्रोजेक्ट समन्वयक रहीम खान, मुंब्रा कौसा भागातील महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी-कर्मचारी भूषण परदेशी, संजय दुबेले,मुंब्रा डॉक्टर फाउंडेशनचे अध्यक्ष असिफ पोची, म्याक्झिम लॅबच्या प्रमुख श्रीमती समीरा उपस्थित होत्या. दरम्यान क्षयरोगा विषयी असणारे समज गैरसमज दूर करून , योग्य आणि वेळेत उपचार घेतल्यावर क्षयरोगावर मात करता येते याबाबतची माहिती आयोजित करण्यात आलेल्या चर्चा सत्राच्या माध्यमातून देण्यात आली. यावेळी श्रीसेवा प्रतिष्ठानच्या कलापथकाने क्षयरोगावरील प्रतिबंधक उपाययोजनेच्या आधारित पथनाट्य सादर करत नागरिकांमध्ये जनजागृती केली.
