ठाणे, दि. 31 (जिमाका) : शहरातील नौपाडा, वागळे इस्टेट, कापूरबावडी, कासारवडवली भागात सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांचे वाहनचालकांपासून संरक्षण व्हावे, यासाठी तीन हात नाका ते धर्मवीरनगर, पायलादेवी मंदिरपासून उपवन ॲम्पीथिएटर आणि कोकणी पाडा, बिरसा मुंडा चौकाकडून ते डॉ. काशिनाथ घाणेकर चौक या मार्गावर प्रायोगिक तत्वावर उद्यापासून सकाळी 5.30 वा ते सकाळी 8.00 वा या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
ठाणे शहरामध्ये नौपाडा, वागळे कापूरबावडी, कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभारण्यात आली असून लोकसंख्या व वाहनाचे प्रमाणात वाढ झाली आहे. सदर परिसरातील नोकरदार वर्ग व उद्योगधंदे करणारे नागरिक दररोज सकाळी त्यांच्या वाहनांनी मुंबई, कल्याण, भिवंडी व नवी मुंबईकडे प्रवास करण्याचे प्रमाण जास्त आहे. या भागात बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले दररोज सकाळी 05.00 ते 07.00 या दरम्यान फिरण्यासाठी बाहेर पडत असतात. त्यावेळी या परिसरात टू व्हिलर, थ्री व्हिलर, फोर व्हिलर वरील वाहनचालक सकाळी भरधाव वेगाने वाहने चालवित असल्याने सदर परिसरातील मॉर्निंग वॉकच्या ठिकाणी अपघात होवून जीवितहानी होवू नये तसेच सदर परिसरात वाहतूक कोंडी होवू नये यासाठी पुढील महिनाभर या भागातील वाहतुकीत प्रायोगिक तत्वावर बदल करण्यात आला आहे. यासंबंधी काही हरकती असल्यास लेखी स्वरुपात वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयात देण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.
या भागातील वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे –
प्रवेश बंद – तीन हात नाका कडून उजवे बाजूच्या सर्व्हिस रोडने धर्मवीरनगर नाका कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना (पायी प्रवासी व सायकल वगळून) तीन हात नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने तीन हात नाका येथून उजवीकडे वळण घेवून हरिनिवास मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – धर्मवीरनगर नाका सर्व्हिस रोडने तीन हात नाका कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना (पायी प्रवासी सायकल वगळून) धर्मवीरनगर नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने धर्मवीरनगर नाका येथून सरळ पूर्व द्रुतगती महामार्गाने इच्छित स्थळी जातील,
प्रवेश बंद – पायलादेवी मंदिर प्रवेशद्वार पासून उपवन अॅम्पीथिएटर कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना (पायी प्रवासी व सायकल वगळून) पायलादेवी मंदिर प्रवेशद्वार येथे डावीकडील मार्गिकेत प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने पायलादेवी मंदिर प्रवेशद्वार येथून उजव्या मार्गिकेतून अॅम्पीथिएटर कडे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – कोकणी पाडा, बिरसा मुंडा चौक कडून हिरानंदानी मेडोज, डॉ. काशिनाथ घाणेकर चौक कडे पवारनगर नवीन रोडच्या डावीकडील एका वाहिनीवरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना (पायी प्रवासी व सायकल वगळून) प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने बिरसा मुंडा चौक येथून महाराजा अग्रसेन चौककडे जाणान्या उजव्या मार्गिकमधून दुहेरी वाहतुकीने इच्छित स्थळी जातील.
हा बदल दि. 01 एप्रिल 2022 रोजी पासून सकाळी 05.30 ते 08.00 वा. दरम्यान 30 दिवसांच्या प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात येत आहे. यास काही आक्षेप प्राप्त न झाल्यास सदरची अधिसुचना कायमस्वरूपी अंमलात राहणार असल्याचे श्री. पाटील यांनी कळविले आहे.
