ठाणे, दि. 7 : ठाणे जिल्ह्यातील सर्व दुकाने व व्यापारी आस्थापनांनी आपल्या आस्थापनांच्या नावाचे फलक इतर भाषेबरोबरच मराठी भाषेमध्ये देवनागरी लिपीत असणे अनिवार्य आहे. तसेच मद्यविक्री व मद्यपान सेवन करणाऱ्या आस्थापनांना कोणत्याही गडकिल्ल्यांची अथवा महापुरुषांची नावे देता येणार नाहीत, अशा सूचना कामगार उपायुक्त कार्यालयाने दिल्या आहेत.
कामगार उपायुक्त कार्यालयाने काढलेल्या परिपत्रकाद्वारे या सूचना दिल्या आहेत. यामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017 च्या कलम 35 अन्वये आस्थापनेच्या नावाचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा फलक प्रदर्शित करणे बंधनकारक असून सदरचा फलक प्रदर्शित करताना मराठी भाषेतील या नामफलकावरील शब्दांचा आकार हा इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. तसेच मद्यविक्री किंवा मद्यपान सेवा देणाऱ्या आस्थापनेस महापुरुषांची किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत, असेही या अधिनियमामध्ये तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी या तरतुदी दहा पेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनां साठी लागू होत्या.
मात्र, आता शासनाने 17 मार्च 2022 रोजी या अधिनियमात सुधारणा केल्या असून अधिनियमातील कलम 6 अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या आस्थापना व कलम 7 नुसार सूचना पत्रे देणाऱ्या सर्व आस्थापनांनाही वरील तरतुदी लागू होतात. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनाच्या मालकांनी आपल्या दुकानांची व आस्थापनांची नावे मराठी भाषेत देवनागरी लिपीत प्रदर्शित करावीत. तसेच मद्यविक्री व मद्यसेवा करणाऱ्या आस्थापनांनी महापुरुषांची अथवा गड किल्ल्यांची नावे देऊ नये, अशा सूचना कामगार उपायुक्त कार्यालयाने केल्या आहेत.
