नवी दिल्ली दि. 4 : महाराष्ट्र विधिमंडळाच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी दि. 5 आणि 6 एप्रिल 2022 रोजी संसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे सांगितले.
नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात डॉ. गोऱ्हे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत अलीकडेच संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली .
महाराष्ट्र विधिमंडळाच्यावतीने विधानसभा व विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी लोकसभा सचिवालय आणि प्राईड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दि. 5 आणि 6 एप्रिल 2022 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी राज्यातील एकूण 110 आमदारांनी नोंदणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम व्यंकैय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला तसेच महाराष्ट्र विधिमंडळाचे पिठासीन अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पानिपत स्मारकाच्या व्यवस्थेबाबत स्थानिक व अधिकाऱ्यांसोबत चर्चा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर अनुयायांनी महाराष्ट्राबाहेर उत्तरेतही समर्थपणे परकीय सत्तांचा सामना करत देश रक्षणाचे कार्य केले. देश रक्षणासाठी पानिपत येथे धारातीर्थी पडलेल्या या शूरांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या पानिपत स्मारकाला भेट देवून या स्मारकाची व्यवस्था अधिक चांगली होण्यासाठी स्थानिक मराठी संघटना, जिल्हाधिकारी व महानगर पालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे ही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या .
