ठाणे दि. २० : उन्हाळा सुरु झाला की शहापुर तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. ही टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदे मार्फत विविध उपाययोजनासह गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. सध्या तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईची झळ बसत असून अशा गावांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी बुधवारी संयुक्त दौरा करून पाण्याची सध्यस्थिती जाणून घेतली. तसेच महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबावी आणि नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी तात्काळ टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्याचे निर्देश ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला देण्यात आले.
त्यांनी अजनूप ग्रामपंचायत मधील वरचा गायदरा, आटगाव ग्रामपंचायत मधील पेंढरघोळ, धामणी ग्रामपंचायत मधील गोलभन, वरस्कोल ग्रामपंचायत मधील कुंभईपाडा, शिरोळ ग्रामपंचायतमधील कुंदनडँम आदी टंचाई गावांमध्ये प्रत्येक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान गावातील नागरिकांसह महिलांशी पाण्याच्या समस्येविषयी चर्चा करण्यात आली, त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. दरम्यान गावातील पाण्याच्या विविध स्त्रोतांची पाहणी करून, पारंपारिक स्रोतांना बळकट करून आगामी काळात पाणीटंचाई होणार नाही अशास्वरुपाची शाश्वत उपायोजना केली जाईल. असे आश्वासन ग्रामस्थांना देऊन सध्यस्थितीत टँकरने मुबलक पाणीपुरवठा करण्याबरोबर ५ हजार साठवणूक क्षमता असणाऱ्या टाक्यांमध्ये पाणीसाठा करणे, पाणी नसलेल्या विहिरीमध्ये टँकरचे पाणी सोडणे आदी उपाययोजनावर भर देण्यात येणार आहे.
या दौऱ्याला जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समिती सभापती वंदना भांडे, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, शहापूर पंचायत समिती सभापती यशोदा आवटे, उप सभापती नयन फर्डे, जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे सदस्य सर्वश्री राजेंद्र विशे, श्री. भगत, श्री. सोनवणे, दशरथ भोईर, राजू कामडी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे , स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ, शहापूरचे गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
