ठाणे दि. 22 (जिमाका) :- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि.29 एप्रिल 2022 ते 3 मे 2022 या कालावधीत अनेक सण व उत्सव, संपन्न होणार आहेत. त्यामुळे दि. 25 एप्रिल ते 9 मे 2022 या कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत शस्त्रबंदी व मनाई आदेश जारी केले असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस उप आयुक्त (विशेष शाखा) डॉ.सुधाकर पठारे यांनी कळविले आहे.
या मनाई आदेशानुसार, या कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे बरोबर नेणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे वाद्य याजविणे इत्यादी. कोणत्याही इसमाचे चित्राचे / प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे / प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल,राज्यशासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे, पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे. मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्ये करण्यास मनाई आदेश लागू केले आहे.
हे आदेश लग्न कार्यासाठी जमलेले लोक, प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका, सरकारी / निमसरकारी कामासाठी कोर्ट कचेऱ्या येथे जमलेले लोक, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका, सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण अशांना लागू असणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. मनाई आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 कलम 135 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त डॉ.सुधाकर पठारे यांनी कळविले आहे.
