ठाणे दि.२२ : पृथ्वीच्या रक्षणाबरोबरच गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी तसेच सन २०३० पर्यन्त नागरिकांना शांतता व समृद्धी प्राप्त करून देण्यासाठी २४ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणाऱ्या पंचायत राज दिनी होणाऱ्या ग्रामसभेत जिल्ह्यातील ग्रामपंचायत शाश्वत विकासाचा संकल्प करणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.ग्रामपंचायत यांनी केलेल्या संकल्पनांची माहिती केंद्र सरकारच्या व्हायब्रॅंट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्डवर देखील प्रसिद्धी केली जाणार आहे.
देशभरातील विविध ग्रामपंचायतीमधून झालेल्या चांगल्या कामाची माहिती देशभरातील सर्व ग्रामपंचायतीना होण्यासाठी ११ ते १७ एप्रिल या दरम्यान दिल्लीत आयकॉनीक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आगामी काळात शाश्वत विकासाच्या ध्येयाची जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. शाश्वत विकासाच्या दृष्टीने जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्रसंघाने जी ध्येय निश्चित केली आहेत, ती साध्य करण्यासाठी पंचायत राज संस्थाचे योगदान महत्वाचे ठरणार आहे.
ग्रामसभांच्या संकल्पनांचे विषय
१) गरीबीमुक्त व उप जीविका वृद्धीस पोषक गाव
२) गावातील सर्वांना उत्तम आरोग्य
३) बालकांना पूर्ण क्षमतेने जगण्याचा, विकासाचा, संरक्षणाचा अधिकार
४) घरघगुती नळ जोडणी, स्वच्छ व पुरेसे पिण्यायोग्य पाणी
५) स्वच्छ आणि हरित गाव
६) पायाभूत सुविधायुक्त स्वयंपूर्ण गाव
७) सामाजिक दृष्टीने सुरक्षित गाव
८) सुशासन युक्त गाव
९) लिंग समभाव पोषक गाव
*व्हायब्रट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्ड*
२४ एप्रिल हा दिवस देशपातळीवर पंचायत राज दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी ग्रामसभेचे आयोजन करून ९ पैकी किमान १ व जास्तीत जास्त संकल्पना निवडण्यासाठी व निवडलेल्या संकल्पनाची माहिती व्हायब्रँट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्डवर ऑनलाइन पध्दतीने सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी ग्रामपंचायतला दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हात ४३१ ग्रामपचायत ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांची कार्यक्रम पत्रिका व्हायब्रँट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्डवर ऑनलाइन पद्धतीने भरण्यात आली असून ग्रामसभा झाल्यानंतर त्याचा अहवाल देखील पोर्टलवर अपलोड केला जाणार आहे.
…………………………
*प्रतिक्रिया*
ग्रामसभांच्या परिणामकारक उपक्रमांची माहिती व्हायब्रँट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्डवर ऑनलाइन पध्दतीने अद्यावत करावी व शाश्वत विकासाच्या संकल्प ठरावाबरोबर आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेत सहभाग घ्यावा.
डॉ. भाऊसाहेब दांगडे ( भा.प्र.से)
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
……………………
दिनांक २२ एप्रिल, जिल्हा परिषद ठाणे
