ठाणे दि. २२ : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दि. २५ एप्रिल २०२२ ते २ मे २०२२ या कालावधीत ठाणे ग्रामिण भागातील कल्याण, अंबरनाथ, मुरबाड व शहापुर तालुक्यात तसेच बदलापुर व अंबरनाथ नगरपालीका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतर्गत १ ते १९ वर्ष वयोगटातील शालेय व शालाबाह्य अशा साधारण २५२८२७ मुला-मुलींना जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी श्री.राजेश नार्वेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे. एक ते दोन वयोगटातील बालकांना अर्धी गोळी तर दोन वर्षावरील मुलांना एक गोळी चावुन / पावडर पाण्यात विरघळवून खायची आहे. या मोहिमेचा उद्देश मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जिवनाचा दर्जा उंचावणे असा असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.
शालेय मुला-मुलींना दि २९ एप्रिल २०२२ रोजी गोळ्या देण्यात येणार आहेत. तसेच उर्वरित सर्व शाळाबाहय मुला-मुलींना आशा व अंगणवाडी कार्यकर्ती मार्फत दि २९ एप्रिल २०२२ ते २ मे २०२२ या कालावधीत घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. अशी।माहिती माता बालसंगोपन अधिकारी डॉ.अंजली चौधरी यांनी दिली.
*जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे आवाहन
जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.पुष्पा गणेश पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री.सुभाष गोटीराम पवार तसेच आरोग्य व बांधकाम समिती सभापती सौ.वंदना किसन भांडे यांनी या मोहिमे दरम्यान सर्व पालकांनी आपल्या मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य सुदृढ करावे असे आवाहन केले आहे.
……………………………….
दिनांक : २२ एप्रिल, जिल्हा।परिषद, ठाणे
