ठाणे दि. २७ : केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनांना गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ कालावधीत महा आवास अभियान राबविण्यात आले. या अभियानाची जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेने ग्रामीण भागात यशस्वी अंमलबजावणी केल्याने प्रधानमंत्री आवास योजनेच्या ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा’ या पुरस्कार गटात जिल्हा परिषदेला ‘तिसरा’ तर ‘सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत’ या पुरस्कार गटात ‘भिवंडी तालुक्यातील ‘चिचवली ग्रामपंचायतीस प्रथम’ पुरस्कार जाहीर झाला. हे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संबधित विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी अभिनंदन केले.
सर्वासाठी घरे २०२२ या शासनाच्या धोरणातर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवित केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमानता आणि गुणवत्ता आणण्यासाठी राज्य शासनाने महा आवास अभियान राबविले. या अभियाना कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर या तालुक्यांमध्ये प्रत्येक्ष कामांची पाहणी केली. वेळोवेळी यंत्रणाना सूचना केल्या तसेच साप्ताहिक आढावा बैठकीसह या अभियानासाठी स्वतंत्र बैठकांचे आयोजन करून कामांना गतिमानता आणण्यासाठी आग्रही राहिले. त्यामुळे शासनाने सांगितलेल्या उपक्रमांची ग्रामीण विकास यंत्रणेने उत्कृष्ट अंमलबजावणी केली. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १०५७ घरकुल पूर्ण करण्यात आली तर ३९ भूमिहीन कुटुंबाला हक्काची जागाही उपलब्ध करून देण्यात आली. सध्या या अभियानाचा दुसरा टप्पा सुरु असून यामध्ये उत्कृष्ट कामाचे नियोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात १७५ घरकुले पुर्ण करण्यात आली आहेत तसेच या अभियानातर्गत शिल्लक १५ भूमीहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्या बाबत पाठपुरावा चालू आहे. अशी माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली.
*९६१० घरं; अभियान काळात नाविन्यपूर्ण उपक्रम*
ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात एकूण ९६१० घरं बांधण्यात आली. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची ६३३७ आणि राज्य पुरस्कृत ३२७३ घर बांधण्यात आली. या अभियान काळात डेमो हाऊस, घरकुल मार्टची उभारणी तसेच लाभार्थ्यांचे मेळावे आयोजित करून अभियानाबाबत जागृतीही करण्यात आली. त्याचबरोबर प्रत्येक घराच्या भिंतीवर वारली चित्र रेखाटण्यात आली. तर काही गावांमधील घरांच्या भींती एकसारख्या रंगाने रंगविण्यात आल्या.
