महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने निर्माण झालेले राज्य आहे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेकांचे योगदान आहे. महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा 1 मे 1960 रोजी प्राप्त झाला. राज्याला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संपन्न वारसा आहे. देशातील सर्वांत प्रगत पुरोगामी, सुधारणावादी राज्य असलेल्या आपल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन दोन वर्षाहून अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. या कालावधीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जनसामान्यांच्या हितासाठी स्विकारलेली धोरणे, घेतलेले निर्णय महत्त्वाचे ठरले असून या निर्णयांमुळे महाराष्ट्रात मोठया प्रमाणात विकास घडून आला आहे. म्हणूनच साऱ्या देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे आहे.
समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर अथक निरंतर चालत राहण्याची महाराष्ट्राची परंपरा आजही कायम आहे. महाविकास आघाडी सरकारचा बहुतांश कालावधी कोविड विषाणूचा अतिशय नेटाने, नियोजनबध्दरितीने मुकाबला करण्यात गेला. मात्र या विषाणूच्या आक्रमणाला न जुमानता या सरकारने वेगवेगळया आघाड्यांवर अधिक जोमाने काम करण्यास सुरुवात केली. कोरोना प्रतिबंधक लसीमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरले आहे. “सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करत राहू, आणि सर्वांगिण विकासाच्याबाबतीत महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचे राज्य बनवू.” या दृढ निश्चियाने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी व विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले.
विविध क्षेत्रांसाठी नवनवीन योजना नुसत्या आणल्याच नाही, तर राबवूनही दाखविल्या. गडकिल्ले संवर्धन, प्राचीन मंदिराचा जीवर्णोध्दार देशाला दिशादर्शक असे इलेक्ट्रिक वाहन धोरण, पर्यटन व्यवसायातून रोजगाराच्या संधी निर्माण करून लोकांमध्ये आत्मविश्वास जागविण्यात हे शासन यशस्वी ठरले.
शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणारी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना यशस्वीपणे राबविली. चक्रीवादळ, अतिवृष्टी, महापूरसारख्या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना केंद्राचे निकष बाजूला ठेऊन अधिकाधिक मदत करण्यात आली. गेल्या दोन वर्षात कोरोना काळात गरिबांचे पोट भरणारी शिवभोजन थाळी अनेक गरजूंना आधार बनली. सर्वसामान्य माणूस, शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, व्यापारी आदी घटकांना आधार देत एकजूटीने, एकदिलाने काम करून सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राची पताका डौलाने फडकवणारे हे सरकार सर्व कसोट्यांना खरे ठरले. कोरोनाच्या संकट काळात राज्य शासन विविध घटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले. या आपत्तीकाळात विकासकामांना खिळ न बसवता त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला. सोबतच आरोग्य यंत्रणा बळकट करण्यात आली.
कोकण विभागात दोन वर्षात भरीव कार्य उभे राहीले, अगदी मोजकेच सांगायचे झाले तर, रत्नागिरी जिल्हयात श्रीक्षेत्र गणपतीपूळे विकासासाठी 102 कोटी खर्च, गोव्याच्या धर्तीवर आरेवारे तसेच गुहागरच्या सागर किनाऱ्यांवर बिच शॅकला मान्यता, मांडवी गावालगतच्या मिऱ्या बंदरावर 160 कोटीच्या बंधाऱ्यास पर्यटन केंद्राच्या स्वरुपात बांधल्याने रत्नागिरीच्या आकर्षणात वाढ, काताळ शिल्पांचे जतन करून त्यापर्यंत पर्यटक जावेत यासाठी विशेष नियोजन, हापूस, काजूसाठी विशेष धोरण, शीतगृहांची निर्मिती.
ठाणे जिल्हयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवी मुंबईतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उभारणी, ठाणे आणि मुलूंड या दोन शहरांना जोडणाऱ्या कोपरी पुलाच्या दोन मार्गिका सुरु, अंबरनाथ मधील प्रसिद्ध शिवमंदिराचा कायापालट व मंदिराच्या परिसराचा विकास, ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसरात साकारणार नौदलाचा इतिहास. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातीन दुर्गाडी किल्ला परिसराचा विकास, नवी मुंबईपासून मुंबई-एलिफंटा-जेएनपीटी अशा विविध मार्गांवर वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे प्रवासी जेट्टी उभारण्यात आली आहे, ठाणे जिल्हयातील पोलीस दलाच्या बळकटीकरणाअंतर्गत 5 कोटी 88 लाख 21 हजार रुपये इतक्या निधीतून 147 वाहने देण्यात आली आहेत, स्मार्ट सिटी प्रकल्पात ठाणे जिल्हा अग्रेसर. ठाणे स्मार्ट सिटीचा समावेश देशातील 100 शहरांमधून 10 शहरामध्ये झाला आहे.
रायगड जिल्हयातशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी 406 कोटींची प्रशासकीय मान्यता तसेच इतर शासकीय बाबींची पूर्तता झालेली असून लवकरच महाविद्यालयाचे बांधकामही प्रत्यक्षात सुरू होईल. यावर्षी 100 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी सुरु झाली आहे, विभागीय क्रीडा संकुलाची उभारणी, जलवाहतूक, रस्ते वाहतूकीसाठी विविध प्रकल्प कार्यान्वित, औद्योगिक विकासात रायगड जिल्हा अग्रेसर. “ऑक्सीजन हब” म्हणून नावलौकीक, नैसर्गिक आपत्तीच्या काळात वीजामुळे होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभारण्यात येणाऱ्या नव्या 82 निवारा शेडमध्ये वीज प्रतिरोधक यंत्रे बसविण्यात येणार, रायगड जिल्हयातील मोठीजूई, बोरली, राजापूरी आणि आवास अशा 4 ठिकाणी चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे.
पालघर जिल्हयात उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथे ऑक्सीजन निर्मितीच्या प्रकल्पाचे लोकार्पण, चिकूसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र, जव्हार पर्यटन क्षेत्र विकासासाठी विशेष विकास कार्यक्रम, आदिवासी विकासासाठी विविध योजना कार्यान्वित. विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप ,डहाणू-बोर्डी किनाऱ्यावर पर्यटन विकास, पालघर जिल्हयात प्रशासकीय इमारतीची उभारणी. एकाच क्षेत्रात सर्व शासकीय कार्यालये, मौजे टेंभोडे येथे 16 एकर जागेमध्ये राष्ट्रीय दर्जाचे जिल्हा क्रिडा संकुल विकसित करण्यात येत आहे. कोकण विभागाची अशी भलीमोठी यादी देता येईल.
आज महाराष्ट्र दिनानिमित्ताने एवढेच की, महाराष्ट्राने सतत ‘महाराष्ट्र धर्म’ जोपासला. लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीमधील महाआघाडीमुळेच साऱ्या देशाचे ‘आशास्थान’ महाराष्ट्र बनले आहे. प्रेरक इतिहासाचा शिव वारसा घेऊन उज्वल भविष्याकडे झपाट्याने निघालेल्या माझ्या महाराष्ट्राला मानाचा मुजराच हवाच!
