ठाणे, दि. 07 :- गांडूळ खत विक्रीचे प्राधिकार पत्र न घेता गांडूळ खतांचे ब्रँडिंग व पॅकिंग करून ते विक्री करत असल्याच्या तक्रारीनंतर कृषि विभागाच्या मोहिम अधिकाऱ्यांनी कल्याण तालुक्यातील अनखरपाडा येथील एका गांडूळ खत उत्पादन प्रकल्पावर कारवाई केली. यावेळी सुमारे 2 लाख 91 हजार सहाशे रुपये किमतीची 16 हजार 465 किलो वजनाचे सिलबंद बॅग व पाकिटातील गांडूळ खत जप्त करण्यात आले असल्याची माहिती कृषि विभागाने कळविली आहे.
या प्रकरणी कृषी विभागाच्या वतीने हेरंब बायोटेक यांच्याविरुद्ध टिटवाळा ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या खत (नियंत्रण) आदेश 1985 मधील कलम 8 (3) नुसार एक वर्षात 50 मे. टन पेक्षा कमी उत्पादन क्षमता असणाऱ्या गांडुळ खत उत्पादन केंद्रांना गांडुळ खत विक्रीसाठी प्राधिकार पत्र आवश्यक नाही. परंतु याच आदेशातील कलम 19 (सी) नुसार ही सुट फक्त ब्रँडिंग व पॅकिंग नसलेल्या सुट्या गांडुळ खत विक्रीसाठी असल्याचे नमुद आहे. तरीही काही गांडूळ खत विक्रेते रितसर विक्री प्राधिकार पत्र घेतलेले नसताना ब्रँडिंग व पॅकिंग करून गांडुळ खत विक्री करत असल्याबाबत तक्रारी कृषि विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीच्या आधारे मोहिम अधिकारी तात्यासाहेब कोळेकर यांनी दि. 31 मे 2022 रोजी, कल्याण तालुक्यातील मौजे अनखरपाडा येथील मे. हेरंब बायोटेक या कंपनीच्या गांडुळ खत उत्पादन प्रकल्पाची तपासणी केली असता त्या ठिकाणी कामधेनु ब्रॅण्ड छापलेल्या एकूण 16,465 किलो वजनाच्या सिलबंद बॅग व सिलबंद पॅकेट्स आढळून आल्यामुळे सदर साठा (अंदाजे किंमत रक्कम रु. 2 लाख 91 हजार सहाशे) जप्त करून त्यांनी मे. हेरंब बायोटेक यांच्याविरुध्द टिटवाळा ग्रामीण पोलीस स्टेशन, टिटवाळा येथे शासनाच्या वतीने गुन्हा दाखल केला.
विक्री प्राधिकार पत्र नसणाऱ्या कोणत्याही उत्पादकाने त्यांचे उत्पादित गांडुळ खत ब्रँडिंग व पॅकिंग करू नये. विनापरवाना गांडुळ खत ब्रँडिंग व पॅकींग करून शेतकऱ्यांना विकताना आढळून आल्यास ती खते जप्त करून उत्पादक व विक्रेत्यांवर गुन्हे नोंदवण्यात येणार आहे, असे कृषि विभागाने जाहिर केले आहे.
या प्रकरणाच्या तपास कामी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ठाणे मोहन वाघ व कृषि विकास अधिकारी सारिका
शेलार यांनी मार्गदर्शन केले. तर कल्याण तालुका कृषि अधिकारी कुमार जाधव, पंचायत समितीचे कृषि विस्तार अधिकारी सुनिल संत आणि कृषि विस्तार अधिकारी बी. डी. जावीर यांनी याकामी मदत केली असल्याचे जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी श्री. कोळेकर यांनी कळविले आहे.
