मुंबई परेल, दि.१२ (पुनीत खांडेकर) प्रतिनिधी : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा ता. तळा संलग्न कुणबी युवा तळा संचलित शिक्षण विभागाच्या वतीने विभाग प्रमुख महेश आंबवले यांच्या नेतृत्वाखाली वाघे हॉल, परेल येथे शैक्षणिक आणि करियर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविके मधून आजवरचा कुणबी युवा तळाचा प्रवास उपस्थिता समोर मांडण्यात आला. शिक्षण विभागाच्या वतीने “अपूर्ण शिक्षण पूर्ण करूया” या मोहीमे अंतर्गत ज्या युवा, युवतींनी अनेक वर्षानंतर शिक्षण पूर्ण केले व आज पदवीधर झाले त्यांचा प्रबोधनपर पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉ राजेश शिगवण सर हे स्वतः Ph.D (Edu) M.Ed (Edu) M.A (History) M.A (Poli science) M.A.(Sociologist) M.A (Public Admin) NET (Edu) SET (Edu) SET (political science) SET (Sociology) Masters of Career Guidance Diploma in psychology
झालेले असून त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी प्रार्थमिक शिक्षणा नंतर पुढील वाटचाल कशी करता येईल, अनेक वर्षांनी शिक्षण कसं सुरू करू शकतो, आई वडिलांचा संघर्ष डोळ्यासमोर ठेऊन अभासात यश कसे मिळवायचे, आपल्या सवयी, संगत, स्वतःची समीक्षा कशी करावी, आपल्या चुका कशा सुधाऱ्याव्यात, प्रशासकीय नोकऱ्यांच्या परीक्षा कशा द्याव्या, त्याच प्रमाणे उच्च शिक्षण कसे घ्यावे, आर्थिक प्रश्नांवर कसे मात करून शिक्षण घ्यावे, पालकांनी आपल्या पाल्याच्या संदर्भात कशा भूमिका घ्यायला हव्यात अशा अनेक भारावून टाकणाऱ्या बारीकसारीक मुद्यांचे विश्लेषण डॉ.शिगवण सरांनी केले .
सदर मार्गदर्शनास २५० हून जास्त विद्यार्थी अन् पालक वर्ग उपस्थित होता. त्याच बरोबर कार्यक्रमाला पाठबळ देण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तळा चे पदाधिकारी, कुणबी युवाचे कार्यकर्ते उपस्थित होते. दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आणि युवाच्या पुढाकाराने उपस्थित सर्वांना जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. अशी मार्गदर्शन शिबिरे ग्रामीण ठिकाणी देखील सातत्याने व्हायला हवी अशा सकारात्मक आणि परिवर्तनवादी प्रतिक्रिया समाज बांधवांनी उस्फुर्त दिल्या. अशा कार्यक्रमांनी अन् मार्गदर्शन शिबिराची समाजाला गरज आहे आणि ही अशी शिबिर झाली तर सृजनशील ,संवेदनशील विद्यार्थी इतिहास रचतील.
