ठाणे दि. 25 :- मुलुंड लायन्स क्लब व हिरो मोटो कंपनीच्या सामाजिक उत्तर दायित्व निधीतून (सीएसआर) ठाण्याच्या महिला व बालविकास कार्यालयास २० दुचाकी देण्यात आल्या.

मुलुंड येथे झालेल्या कार्यक्रमात महिला व बालविकास कार्यालयास या गाड्यांची चावी सुपूर्द करण्यात आली. यावेळी लायन्स क्लबचे लुनकरण टावरी, सुमित कटीयाल, हिरो मोटो कंपनीचे अजित जाचक, मुलुंड लायन्स क्लबचे अध्यक्ष विरेंद्र कटीयाल, ठाण्याचे महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

लायन्स क्लब व हिरो मोटो कॉर्प कंपनीकडून सामाजिक उत्तरदायित्व निधीतून महिला व बालविकास कार्यालयास दुचाकी मिळण्यासाठी
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्याच बरोबर या वाहनांचे विमा, परिवहन कर व इतर कर माफ करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.
महिला व बालविकास कार्यालयास मिळालेल्या या गाड्या संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी / कर्मचारी, अध्यक्ष, बाल कल्याण समिती, जिल्ह्यातील ७ शासकीय बालगृह / निरिक्षणगृह / संरक्षणगृह / भिक्षेकरीगृहाना आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. या दुचाकी गाड्यांमुळे मा. न्यायालयाची नोटीस बजावणी करणे, मा. न्यायलयास अहवाल सादर करणे, बाल विवाह होणार असल्यास सदर ठिकाणी तात्काळ पोहचणे, बालकांवरील / महिलांवरील अत्याचाराची घटना समजल्यावर घटनेच्या ठिकाणी तात्काळ पोहचणे शक्य होणार आहे. तसेच शासकीय बालगृह / निरिक्षणगृह / संरक्षणगृह / भिक्षेकरीगृहातील प्रवेशितांना आवश्यक त्यावेळी रुग्णालयात ने-आण करणे, त्यांच्या पालकांशी भेटीसाठी नेणे, शाळेस भेटी देणे व इतर शासकीय कामे जलद गतीने करण्यास मदत होणार आहे.

महिला व बाल विकास कार्यालयास सक्षमीकरणासाठी जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी नेहमी मदत केलेली असून वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे ठाणे जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाची कामे जलद गतीने होत आहेत. कार्यालयास या दुचाकी गाड्या मिळाल्यामुळे महिला व बालविकास विभागाची कामे जलदगतीने होणार असून अतिजलद प्रतिसाद टीमला याचा उपयोग होणार असल्याचे श्री. गायकवाड यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्री गायकवाड यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.
