ठाणे, दि.24 : खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी व शेतकरी बांधवांच्या हितार्थ दि. २५ जून ते १ जुलै २०२२ या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञांमार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती, असे जिल्हा अधीक्षक कृषि मोहन वाघ यांनी दिली आहे.
कृषि संजीवनी मोहिमेअंतर्गत गावनिहाय नियोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत 1636 प्रशिक्षण, 557 प्रात्यक्षिके, तालुका/ जिल्हास्तरावर 164 वेबिनार, 223 शेतीशाळा वर्ग,342 शिवार फेरी, 1431 किसान गोष्टी कार्यशाळा व इतर असे कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.
दि. २५ जूनला भात लागवड तंत्रज्ञान अंतर्गत चारसूत्री, एस.आर.टी.,ड्रम सिडर लागवड पद्धतीबाबत
शेतकऱ्यांना प्रशिक्षण, तूर पिक लागवड तंत्रज्ञान, भात खाचरांच्या बांधावर तूर पिकांची लागवड, भात, नागली व तूर बिजप्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता तपासणी, भात व नागली पिकांवरील मुख्य किड व रोग ओळखणे, आर्थिक नुकसानीची पातळी, भात पिकामध्ये हिरवळीच्या खताचे महत्व, ई- पिक पाहणी इ. कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दि.२६ जूनला पौष्टिक तृणधान्य दिवसानिमित्त पौष्टिक तृणधान्यांची लागवड तंत्रज्ञान, पिक प्रक्रिया, मूल्यवर्धन तसेच प्रक्रिया केंद्रांना भेटी, लागवडीसाठी मिनिकीट मोफत वाटप, ई- पिक पाहणी इ. कार्यक्रम होणार आहेत. दि. २७ जून रोजी महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस आयोजित केला असून यामध्ये महिलांकरिता कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण, नाचणी व वरीपासून बनविण्यात येणा-या पदार्थाची पाककला स्पर्धा, महिलांना वापरता येतील असे शेतीतील यंत्रसामग्री संदर्भात माहिती देण्यात येणार आहे.
दि. २८ जून रोजी खत बचत दिन कार्यक्रमात जमीन सुपिकता निर्देशांक फलकाचे वाचन व कृषक ऍप्प, पिक उत्पादन तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने माती, पाणी परिक्षण तपासणी, मिश्र खते बनविण्याची कार्यपध्दती व घरच्या घरी रासायनिक खतामधील भेसळ ओळखणे, खतांचा संतुलित वापर, पिकांची खतमात्रा बनवणे, सूक्ष्म मुलद्रव्य महत्त्व, विद्राव्य खते व त्यांचा वापर, नॅनो युरिया खताचा वापर व खतांचे महत्व, जैविक खते व कंपोस्ट तयार करण्याची पध्दत इ.बाबत मार्गदर्शन केले जाईल. दि. २९ जून २०२२ रोजी प्रगतीशील शेतकरी संवाद दिवस कार्यक्रमात प्रत्येक जिल्ह्यातील रिसोर्स बँक मधील शेतकऱ्यांकडून त्यांनी अवलंबिलेल्या तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतावर क्षेत्रीय भेटी, आयएनएम, आयपीएम बाबत वेबिनार आयोजित करण्यात येणार आहेत. दि. ३० जून रोजी शेती पुरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस कार्यक्रमात शेती व्यवसायास पूरक जोडधंदा म्हणून शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेततळ्यातील मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन, संरक्षित शेती, भाजीपाला, रोपवाटीका इ. व्यवसायांसंबंधी योजनाची माहिती देण्यात येईल. दि. १ जुलै रोजी कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता कृषी दिन साजरा करून होईल, असे श्री.वाघ यांनी कळविले आहे.
