
ठाणे दि. 05 : ग्रामीण जीवन्नोती अभियान अर्थात उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी ठाणे जिल्ह्याचा दौरा करत अभियानातर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. दरम्यान त्यांनी शहापूर तालुक्यातील स्वप्नपूर्ती आदर्श प्रभाग संघाला भेट देऊन येथील महिलांशी संवाद साधला. यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे उपस्थित होत्या.
महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या मार्फत 2017 पासून उमेद अभियान राबविले जाते. या अभियानांतर्गत महिलांचे छोटे-छोटे बचत गट अर्थात स्वयं सहाय्यता समूह तयार केले जातात. काही स्वयं सहाय्यता समूह एकत्रित करून त्यांचा प्रभाव संघ तयार केला जातो. असे ठाणे जिल्ह्यात 33 प्रभाग संघ आहेत. हे प्रभाव संघ धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी केलेले आहेत. या संघाच्या माध्यमातून गृहपयोगी वस्तूपासून, विविध जीवनाश्यक वस्तू तयार करून त्यांची विक्री केली जाते. महिला विविध लघुउद्योग या अभियानातर्गत उभारतात. डॉ. वसेकर यांनी अशाच प्रभाग संघाना भेट देऊन संस्था बांधणी, क्षमता बांधणी, आर्थिक समावेशन, उपजीविका या बाबत माहिती देऊन स्वयं सहाय्यता गटातील महिलांसोबत चर्चा केली.
यावेळी उमेद अभियानांतर्गत मिळणाऱ्या निधीचा उपयोग उपजीविका साधन तयार करण्यासाठी होत असल्याची प्रांजल कबुली महिलांनी दिली. तसेच अभियानाच्या आर्थिक पाठबळतेमुळे हळदीची शेती करण्यास प्रोत्साहन मिळाल्याचेही महिलांनी डॉ. वसेकर यांना सांगितले. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक हसन तडवी यांच्यासह अमित सय्यद, सारीका भासले , सुनिल पाटील , स्वाती तुपसौदरे, प्रतिक्षा अगिवाले, अस्मिता मोहीते, बाळासाहेब सावंत आदी उपस्थित होते.
