ठाणे, दि.5 : समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांनीसाठीच्या 75 क्षमता असलेल्या वसतीगृहासाठी भाडेतत्वावर खाजगी इमारत घेण्यात येणार आहे. अशी इमारत भाडेतत्वावर देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालक/विकासकांनी अर्ज करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बलभीम शिंदे यांनी केले आहे.
वसतीगृहासाठीची ही खाजगी इमारत ठाणे परिसरात अथवा ठाणे रेल्वे स्टेशनजवळ किंवा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असावी. किमान 5000 ते 7500 चौ.फुट क्षेत्रफळ असावे. इमारतीमध्ये 10 स्वच्छतागृह व 10 स्नानगृहाची सुविधा असावी. इमारत अधिकृत असावी. मालकाकडे पूर्णत्वाचा दाखला असावा. सदर इमारतीचे भाडे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठरविल्यानुसार घेण्याबाबतचे संमतीपत्र मालकाने देणे आवश्यक असेल. या अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक इमारत मालक/ बांधकाम विकासक यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, 5 वा मजला, जिल्हाधिकारी इमारत, कोर्ट नाका, ठाणे (प) या कार्यालयाकडे किंवा गृहपाल, मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह ठाणे, कोठारी कंपाऊंडजवळ, टिकुजिनीवाडी, मानपाडा, घोडबंदर रोड, जि.ठाणे यांच्याकडे लेखी स्वरूपात अर्ज करावे, असे श्री.शिंदे यांनी कळविले आहे.
