ठाणे, दि. १ : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळा मार्फत मध केंद्र योजना (मधमाशा पालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वीत झाली असून पात्र व्यक्ती / संस्थानी अर्ज करावेत, असे आवाहन ठाणे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नेहा देवरुखकर यांनी केले आहे.
मध केंद्र योजनेअंतर्गत मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. तसेच योजनेतील सहभागींना साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान देण्यात येते. तर ५० टक्के ही स्वगुतंवणूक असते. शासनाच्या हमी भावाने मध खरेदी केली जाते. विशेष / छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती अशी योजनेची वैशिष्ट्ये आहेत.
वैयक्तिक मधपाळ पात्रतेसाठी अर्जदार साक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे. अर्जदाराने मंडळाचे मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्रात १० दिवसाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. केंद्रचालक प्रगतिशील मधपाळ व्यक्ति गटासाठी किमान १० वी पास असावे, वय वर्ष २१ पेक्षा जास्त असावे. व्यक्तिच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान १ एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था गटासाठी ही संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे अथवा भाडेतत्वावर घेतलेली किमान एक हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे एक एकर स्वमालकीची/भाडयाने घेतलेली शेत जमीन असावी. मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता असलेली सेवा असावी, ही पात्रता आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, लक्ष्मी विष्णु सदन, महर्षि कर्वे रोड, नौपाडा, ठाणे किंवा फोन नं. ०२२ २५३६६०७५ किंवा मोबा. क्र. ९४२२९८२६२९ व ७३९७९१६१२० अथवा संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं. ५, मु.पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा- दुरध्वनी ०२१६८-२६०२६४ येथे संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नेहा देवरुखकर केले आहे.
